भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुलीवर अलीकडे एक आरोप करण्यात येत आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष दादा असूनही महिलांचे क्रिकेट लयास जात आहे. मागच्या वर्षी पासून कोविड-19 महामारी सुरू असतानाही भारतीय पुरुष संघ नियमित क्रिकेट खेळत आहे, मात्र महिला संघाला अनेक स्पर्धेत भाग घेता आला नाही. या आरोपातून बीसीसीआयकडून महिला क्रिकेट सोबत दुजाभाव होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.
नेमका काय आहे आरोप?
कोरोना महामारी दरम्यानही बीसीसीआयने भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी आयपीएल 2020, ऑस्ट्रेलिया दौरा, नंतर इंग्लंड सोबत भारतात मालिका आणि आयपीएल 2021 आयोजित केले होते. यातून बीसीसीआयची पुरुष संघासाठी असलेली प्राथमिकता दिसून येते. या कारणामुळे चाहते बीसीसीआय महिला क्रिकेटला प्राथमिकता देत नसल्याचे आरोप करत आहेत.
सौरव गांगुलीने दिले उत्तर
“आपण या जीवघेण्या विषाणू सोबतच जगत आहोत, आपण तरी करू काय शकतो. तसे असले तरीही भारतीय महिला संघाचा आगामी काळ खूप व्यस्त राहणार आहे.” असे स्पोर्टस्टारला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीने म्हटले आहे.
देशात कोविड-19 चा प्रादुर्भाव खूप वाढला आहे. कोविड -19 च्या काळात कोणतीही स्पर्धा आयोजित करणे फार कठीण काम आहे. मागच्या वर्षी यूएईमध्ये पुरुषांच्या आयपीएल सोबतच महिलांचीही स्पर्धा घेण्यात आली आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने यावर्षी भारताचा दौरा केला असल्याचे, सौरव गांगुलीने लक्षात आणून दिले.
महामारी सुरू असतांनाही विशेष काळजी घेऊन महिला क्रिकेट खेळवण्यात येणार असल्याचे गांगुलीने स्पष्ट केले. भारतीय महिला संघ आगामी काळात 8 वर्षांनंतर प्रथमच कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना इंग्लंडसोबत खेळला जाईल. इंग्लंड दौर्यानंतर भारतीय महिला संघ न्यूझीलंड विरुद्ध मालिका खेळेल.
भारतीय महिला क्रिकेट संघाचा व्यस्त कार्यक्रम
महिला क्रिकेटच्या आगामी नियोजनाबद्दल बोलताना गांगुली म्हणाले की, “आपला महिला संघ तब्बल 8 वर्षांनंतर कसोटी सामना खेळणार आहे. ब्रिस्टलमध्ये हा सामना होणार आहे. सोबतच 6 एकदिवसीय आणि टी-20 सामने संघ खेळणार आहे. यानंतर वेस्ट-इंडिज भारतात येणार आहे. एवढे काही करूनही मी महिला क्रिकेटचे समर्थन करत नसल्याचा आरोप करणार का? अजूनही खूप महिला क्रिकेट खेळले जाणार आहे. यावर्षीचे महिला आयपीएल रद्द करावे लागले असले तरी हे महिला आयपीएल आम्ही सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये आयोजित करणार आहोत.”
मुलाखती दरम्यान बीसीसीआय अध्यक्ष पुढे म्हणाले की, “भारतीय महिला संघ 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. यानंतर काही महिला खेळाडू इंग्लंड मधील 100 बॉल क्रिकेट स्पर्धेत खेळणार असून काही ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग मध्ये सहभाग घेणार आहेत. पुढे महिला संघ न्यूझीलंड दौर्यावर जाणार आहे आणि त्यानंतर विश्वकप होणार आहे.”
आंतरराष्ट्रीय क्रिकेट शिवाय भारतीय महिला खेळाडू इंग्लंडमध्ये द हंड्रेड आणि ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगमध्ये खेळणार आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाचा एवढा व्यस्त कार्यक्रम जाणून घेतल्यावर चाहते नक्कीच खुश होणार आहेत. सोबतच, सौरव गांगुलीवर करण्यात आलेला आरोपही चाहते मागे घेऊ शकतील असे दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
या मैदानावर होतील भारत विरूद्ध श्रीलंकेचे सामने
एकाच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार भारताचे दोन संघ, पाहा यापूर्वी केव्हा घडले आहे असे
सुशीलमुळे कुस्ती क्षेत्राची नाचक्की, कुस्ती महासंघाची त्या घटनेवर मोठी प्रतिक्रिया