भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील बीसीसीआयने आयपीएल २०२१ स्पर्धा भारतातच खेळवण्याचा निर्णय घेतला होता. या स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. त्यामुळे आयपीएल स्पर्धा अनिश्चित स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्याच्या वाटेवर आहे. परंतु भारतात कोरोनाचा हाहाकार काही कमी होताना दिसत नाहीये.
त्यामुळे असे कयास लावले जात होते की, आयपीएलचे शेष सामने भारतात होणार नाहीत. अशातच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी उर्वरित आयपीएल स्पर्धा खेळवण्याबाबत मोठे भाष्य केले आहे.
स्पोर्ट्स स्टारवर बोलताना सौरव गांगुली म्हणाले, “१४ दिवस विलग्नवासात राहण्यास खेळाडूंना समस्या होत आहेत. हे हाताळणे अवघड असते. आता सध्या हे सांगणे कठीण आहे की, ही स्पर्धा केव्हा होणार. इंग्लंड, युएई, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया ही स्पर्धा आयोजित करण्याच्या शर्यतीत कायम आहेत.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “आपण गेल्या एक वर्षापासून कोरोनामुळे त्रासून गेलो आहोत. डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ पर्यंत आपण संघर्षच करत आहोत. सर्वच लोक या कठीण काळात संघर्ष करत आहेत. त्यामुळे क्रिकेटपटूही यापेक्षा काही वेगळे नाहीयेत. गतवर्षी युएईमध्ये आयपीएलचे आयोजन करणे देखील आमच्यासाठी एक आव्हानच होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्व काही विचलित झाले आहे. अशातच तुम्ही देखील अंदाज घेऊ शकतात की, उर्वरित आयपीएल स्पर्धा आयोजित करणे किती कठीण आहे.”
“बायो बबलच्या नियमाचा आम्हाला सगळ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. डिसेंबर-फेब्रुवारी महिन्यात भारतात कोरोनाचे रुग्ण कमी होते. याच काळात आम्ही विजय हजारे ट्रॉफी, सैयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा घेतली होती. या स्पर्धा यशस्वीरित्या पार देखील पडल्या होत्या. परंतु दुसरी लाट आल्यामुळे आम्ही ज्युनियर क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. जर सर्व सुरळीत झालं तर नक्कीच आम्ही ही स्पर्धा देखील खेळविण्याचा विचार करू,” असे सौरव गांगुली शेवटी बोलताना म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका ‘अशा’ फरकाने जिंकेल टीम इंडिया, ‘द वॉल’ द्रविडची भविष्यवाणी