इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लीड्स मैदानावर खेळला जाणार आहे. दोन्ही संघ पूर्ण तयारीसह या मैदानावर उतरतील. सामना सुरू होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना भारतीय संघ देखील आपल्या तयारीवर अखेरचा हात फिरवताना दिसत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, त्यामध्ये भारतीय संघ सराव करताना दिसतोय.
बीसीसीआयने शेअर केला व्हिडिओ
बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय खेळाडू सराव करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरवातीला सर्व भारतीय खेळाडू मैदानात उतरताना दिसले. त्यानंतर सर्व प्रमुख भारतीय फलंदाजांना सराव करताना आपण पाहू शकतो. रोहित शर्मा पूल तर, केएल राहुल कव्हर ड्राईव्ह मारताना दिसला. कर्णधार विराट कोहली याने उंचावरून काही फटके मारण्याचा सराव केला.
All SET 💪🏻
Who else is excited for the 3rd Test at Headingley 🏟️#TeamIndia 🇮🇳 | #ENGvIND pic.twitter.com/D0ih5s6Toj
— BCCI (@BCCI) August 24, 2021
भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने काही बचावात्मक फटके खेळले. आपल्या संथ फलंदाजीसाठी सतत टीकेला सामोरे जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने नेटमध्ये काही आक्रमक फटके मारले. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज व पहिल्या दोन्ही कसोटी फलंदाजीत उपयुक्त कामगिरी केलेल्या जसप्रीत बुमराह यानेदेखील फलंदाजीचा सराव केला.
भारतीय संघाची मालिकेत आघाडी
नॉटिंघम येथील पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारतीय संघाने लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत विजय मिळवला. भारतीय गोलंदाजांनी पाचव्या दिवशीच्या अखेरच्या दोन सत्रात यजमान इंग्लंडला सर्वबाद करत मालिकेत आघाडी मिळवली. तिसरा सामना २५ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या कालावधीत खेळला जाईल.
तिसऱ्या कसोटीसाठी संभावित भारतीय संघ-
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व इशांत शर्मा.
महत्त्वाच्या बातम्या-
ज्याची भिती तेच झाले! अफगाणिस्तान वि. पाकिस्तान वनडे मालिका अनिश्चित काळासाठी स्थगित
भारीच की! वॉर्नर कुटुंबात ‘वाथी कमिंग’चे पसरले वारे, बापासह लेकींनीही धरला ठेका