संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात खराब कामगिरी करत भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर पडला. पाकिस्तान व न्यूझीलंड विरुद्ध झालेले पराभव हे भारतीय संघाचे उपांत्य फेरीत न पोहोचण्याचे महत्त्वाचे कारण ठरले. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) निराश झाले असून, ते विश्वचषकात झालेल्या खराब कामगिरीनंतर निवड समिती आणि संघ व्यवस्थापन यांना अहवाल मागणार आहेत. यामध्ये अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्या तंदुरुस्ती चाचणीचा देखील अहवाल असू शकतो.
बीसीसीआय मागू शकते अहवाल
विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून विश्वचषकात सहभागी झालेल्या भारतीय संघाला साखळी फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर विविध स्तरातून संघावर टीका केली जात आहे. बीसीसीआय निवड समिती व संघ व्यवस्थापन यांना या कामगिरीबाबत विचारणार असून त्याचा एक सविस्तर चौकशी अहवाल मागितला जाईल. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले,
“निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला या कामगिरीचे उत्तर द्यावे लागेल. तसेच या उत्तरात अष्टपैलू हार्दिक पंड्याचा तंदुरुस्ती अहवाल देखील असेल.”
आम्हाला सर्व उत्तरे द्यावी लागायची
भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे माजी सदस्य असलेल्या सरणदीप सिंग यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना म्हटले,
“आमच्या काळात अशी कामगिरी झाल्यानंतर आम्हाला उत्तर द्यावे लागायची. तुम्ही हार्दिकला या विश्वचषकात अष्टपैलू म्हणून नेले होते. मात्र, त्याचा तसा फायदा झाला नाही.”
आक्रमक फलंदाज आणि मध्यमगती वेगवान गोलंदाज असलेला हार्दिक सहभागी झाला असला तरी त्यांनी पहिल्या दोन महत्त्वपूर्ण सामन्यात गोलंदाजी केली नव्हती. तो गोलंदाजीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त वाटत नव्हतं. अफगाणिस्तान विरुद्धचा सामना वगळला तर त्याला न्यूझीलंड आणि पाकिस्तान विरुद्ध फलंदाजीत छाप सोडता आली नव्हती.