मुंबई । भारताचा सर्वात यशस्वी आणि चाणाक्ष माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला १५ ऑगस्टला बाय-बाय केले. धोनीने अचानक निवृत्ती घेऊन सर्व क्रिकेट प्रेमींना एक धक्का दिला. आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकणारा दिग्गज कर्णधार अशा प्रकारे निवृत्त होईल याची कोणालाही खात्री नव्हती.
महान फलंदाज सचिन तेंडुलकरप्रमाणे धोनीसाठी फेअरवेल सामना (निवृत्तीचा सामना) होईल, अशी लोकांना अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. धोनीच्या निवृत्तीनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांचा फेअरवेल सामना करण्याची मागणी केली. यावर बीसीसीआयची प्रतिक्रियाही समोर आली आहे.
काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) एमएस धोनीसाठी फेअरवेल सामना आयोजित करण्यास सज्ज आहे. बीसीसीआयच्या अधिकार्याने माहिती दिली आहे की, ‘आगामी आयपीएल दरम्यान बोर्ड याप्रकरणी धोनीशी चर्चा करेल आणि त्यानंतर त्यानुसार भविष्यातील वेळापत्रक निश्चित केले जाईल. सध्या आंतरराष्ट्रीय मालिका नाही. आयपीएलनंतर धोनीसाठी फेअरवेल सामन्याचे आयोजन केले जाऊ शकते.’
बीसीसीआयच्या अधिकार्याने सांगितले की, ‘धोनीसाठी फेअरवेल सामना आयोजित केला जावा अशी मंडळाची नेहमीच इच्छा होती. आयपीएल दरम्यान बोर्ड त्याच्याशी चर्चा करेल आणि त्याचा सन्मान करणे बीसीसीआयच्या दृष्टीने सन्मानची बाब असेल. धोनी मान्य करो अथवा नाही, त्याच्यासाठी एक विशेष सोहळा आयोजित केला जाईल.’
माजी क्रिकेटपटू मदन लालनेही धोनीसाठी फेअरवेल सामना आयोजित करण्याची मागणी केली होती. ते म्हणाले, ‘जर बीसीसीआयने धोनीसाठी फेयरवेल सामन्याचे आयोजन केले तर प्रत्येकजण खूप आनंदी होईल. आपण त्याला असे जाऊ देऊ शकत नाही. त्याच्यासाठी भारत विशेष मालिका आयोजित करू शकतो.’