भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अपेक्स कौन्सिलची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली तसेच काही महत्त्वाचे निर्णय देखील घेतले गेले. यामध्ये बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला असून, यामध्ये युवा गोलंदाजांसाठी बीसीसीआय एक नवा टॅलेंट हंट प्रोग्राम सुरू करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने वेगवान गोलंदाजांची निवड केली जाईल.
सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या बेंच स्ट्रेंथमध्ये अनेक वेगवान गोलंदाज दिसून येतात. मात्र, एक-दोन मालिकांनंतर हे गोलंदाज आपला प्रभाव पाडण्यात अपयशी ठरतात अथवा दुखापतग्रस्त होतात. त्यामुळे खास करून कसोटी क्रिकेटमध्ये भविष्यातील गोलंदाजांचा विचार करता या योजनेचा उपयोग केला जाईल. देशभरातील विविध शहरांमध्ये हा टॅलेंट हंट प्रोग्राम आयोजित करण्यात येणार आहे.
यामधून निवडलेल्या गोलंदाजांना बंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) येथे प्रशिक्षण देण्यात येईल. या गोलंदाजांची वयोमर्यादा 18-23 दरम्यान असेल. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले,
“कसोटी क्रिकेटमधील भवितव्याचा विचार करून ही योजना अंमलात आणली जाईल. केवळ चांगले गोलंदाज नव्हे तर तंदुरुस्त वेगवान गोलंदाज तयार करण्याकडे आमचा भर राहील. याची सुरुवात झाली असून सध्या बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या महिला संघातील काही प्रमुख खेळाडूंना तंदुरुस्तीच्या मुद्द्यावरून संघात समाविष्ट केले नाही.”
याच बैठकीत देशांतर्गत क्रिकेटमधील अनेक निर्णयांबाबत देखील चर्चा करण्यात आली. आगामी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेयर नियम वापरायचा की नाही याबाबत देखील चर्चा झाली. तसेच देशांतर्गत क्रिकेटमधील वरिष्ठ खेळाडूंच्या निवृत्तीनंतरच्या पेन्शनचा मुद्दा देखील उचलला गेला.
(BCCI Will Start Talent Hunt Programme For Fast Bowlers Across Country)
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजमध्ये नेहमीच तळपते मराठमोळ्या अजिंक्यची बॅट, आतापर्यंतचा रेकॉर्ड 140 कोटी भारतीयांची मान उंचावणारा
सातासमुद्रापार विश्वविजेती बनली सातारची आदिती! तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये घेतला सुवर्णवेध






