येत्या शनिवारपासून (७ फेब्रुवारी) ‘आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६’ ही स्पर्धा होत आहे. यापूर्वी बांग्लादेशने भारतात खेळण्यास नकार दिल्याने विश्वचषक स्पर्धेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. आता बांग्लादेशच्या जागी स्कॉटलँड संघाची वर्णी लागली आहे. त्यानंतर आता पाकिस्तान संघाने भारताविरूद्धचा सामना खेळणार नसल्याचे सांगितले. यावर बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार राजीव शुक्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अधिवेशनादरम्यान सभागृहाच्या बाहेर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भारत-पाकिस्तान सामन्यावर भाष्य केले.
टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानने भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याचे ठरविले आहे. कोलोंबोमध्ये १५ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये टी-२० सामना होणार आहे. दरम्यान, पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी पाकिस्तान भारताविरूद्धची मॅच खेळणार नाही असं जाहीर केले होते. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे.
आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकला आहे, यावर काँग्रेस खासदार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्लांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शुक्ला म्हणाले,”बीसीसीआयला यावर काहीही म्हणायचे नाही. आयसीसीने यावर निर्णय घ्यायचा आहे आणि आयसीसी जे काही म्हणेल, आम्ही त्या निर्णयानुसारच जाऊ…”. त्यामुळे आता आयसीसी काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघात १५ फेब्रुवारी रोजी टी-२० सामना नियोजित आहे. त्यावर बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले, “टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध सामना खेळणार नाही. क्रीडा क्षेत्रात कोणतेही राजकारण नसावे, अशी आमची भूमिका आहे. बांग्लादेशच्या पाठीशई आपल्याला पूर्णपणे उभं राहिलं पाहिजे”. पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांच्या वक्तव्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणारा सामना रद्द होण्याची शक्यता आहे. आता यावर आयसीसी कोणती कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले होते. याचा प्रत्यय क्रीडा क्षेत्रातही जाणवला होता. २०२५ मध्ये झालेल्या आशिया कपमधील सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानच्या संघाशी ‘हस्तांदोलन करणे टाळले होते. त्यानंतर झालेल्या सामन्यांमध्ये दोन्ही संघात मोठी चुरस झाली होती. अंतिम सामना विजयानंतर भारतीय संघाने पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांच्याकडून आशिया कप घेण्यास नकार दिला होता.






