भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी हे वर्ष मैदावरील आणि मैदानाबाहेरील अनेक कारणांमुळे खास ठरले आहे. या वर्षात त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याने या वर्षी क्रिकेट कारकिर्दीतील ५० शतकेही पूर्ण केली, तसेच सचिन तेंडुलकरच्याही काही विक्रमांना मागे टाकले आहे.
या ५ कारणांमुळे हे वर्ष ठरले विराटसाठी खास:
५. क्रिकेटच्या सर्व प्रकारात ५० ची सरासरी: यावर्षी विराट कोहलीने क्रिकेटच्या तीनही प्रकारात ५० पेक्षा जास्तच्या सरासरीने धावा करण्याचा विक्रम केला आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारात ५० पेक्षा जास्त सरासरी असणारा तो एकमेव फलंदाज आहे.
विराटची सध्या कसोटीमध्ये ५३.७५ ची, वनडेमध्ये ५५.७४ची आणि आंतराष्ट्रीय टी २० मध्ये ५२.८६ ची सरासरी आहे.
४. कर्णधारपद : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने या वर्षाच्या सुरवातीलाच सर्व प्रकारच्या क्रिकेटचे कर्णधारपद सोडले. त्यामुळे फक्त कसोटी कर्णधार असलेल्या विराट कोहलीला सर्व प्रकारच्या क्रिकेटसाठी भारतीय संघाचा कर्णधार करण्यात आले.
त्याने या वर्षी ४६ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. यातील ३१ सामन्यात त्याने विजय मिळवला आहे. यात ६ कसोटी, १९ वनडे आणि ६ टी २० सामन्यांच्या विजयाचा समावेश आहे.
३. सचिनचा सार्वकालीन वनडे क्रमवारीचा विक्रम विराटने टाकला मागे: यावर्षी ३१ आक्टोबरला आयसीसीने घोषित केलेल्या वनडे क्रमवारीत विराटने अव्वल स्थान मिळवतानाच सचिन तेंडुलकरचा सार्वकालीन वनडे क्रमवारीचा विक्रम मागे टाकला.
त्यावेळी विराटच्या नावावर रेटिंगचे ८८९ पॉईंट्स होते. त्याने हे पॉईंट्स मिळवताना सचिनच्या ८८७ पॉईंट्सचा विक्रम मोडला होता. जगातील सर्व खेळाडूंच्या सार्वकालीन यादीत विराट १४ व्या क्रमांकावर आला आहे.
२. विराट अनुष्काचे लग्न: ११ डिसेंबरला इटलीतील मिलान शहरात विराट आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने लग्न केले. त्यांचा हा विवाह सोहळा कुटुंबीय आणि मित्रपरिवारांच्या उपस्थितीत पार पडला. विराट आणि अनुष्काने लग्नाआधीपर्यंत या बातमीबद्दल पूर्णपणे गुप्तता ठेवली ठेवली होती त्यानंतर त्यांनी सोशल मीडिया वरून सर्वांना याची माहिती दिली.
विराट आणि अनुष्काने त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्ली आणि मुंबईमध्ये आयोजित केले होते. यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.
१. ५० शतके: विराटने आंतराष्ट्रीय कारकिर्दीत ५० शतके पूर्ण करत आणखी एका मोठ्या विक्रमला गवसणी घातली. असा विक्रम करणारा तो सचिन तेंडुलकर नंतरचा दुसराच भारतीय खेळाडू ठरला आहे.
विराटने श्रीलंकेविरुद्ध पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक करताना हा विक्रम केला. त्याने या सामन्यात दुसऱ्या डावात ११९ चेंडूत नाबाद १०४ धावा केल्या होत्या. विराटच्या नावावर सध्या ५२ शतके आहेत. यात २० कसोटी आणि ३२ वनडेतील शतके आहेत.