पुणे। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे मंगळवारपासून (२३ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेची सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात एक अनोखा योगोयोग पाहायला मिळाला. या सामन्यात दोन्ही संघांकडून सख्या भावांच्या जोड्या खेळत होत्या.
भारताकडून पहिल्या वनडेतून कृणाल पंड्याने पदार्पण केले. तर त्याचा धाकटा भाऊ हार्दिक हा देखील या सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात सामील होता. त्यामुळे पंड्या बंधूंनी पहिल्यांदाच वनडेत एकत्र सामना खेळला. याशिवाय इंग्लंडकडूनही सॅम आणि टॉम हे करन बंधू एकत्र या सामन्यात खेळत होते.
त्यामुळे एकाच वनडे सामन्यात दोन प्रतिस्पर्धी संघाकडून सख्या भावांची जोडी खेळण्याची ही फेब्रुवारी २०१४ नंतरची पहिलीच वेळ आहे. यापूर्वी शेवटचे फेब्रुवारी २०१४ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड संघात झालेल्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजकडून ड्वेन आणि डॅरेन हे ब्रावो बंधू आणि आर्यंलडकडून केविन आणि निल हे ओब्रायन बंधू खेळले होते.
पदार्पणात कृणालने पाडली छाप
पदार्पणाच्या सामन्यात कृणालने अर्धशतकी खेळी केली. त्याने २६ चेंडूत अर्धशतकी खेळी केल्याने तो वनडे पदार्पणात सर्वात जलद अर्धशतक करणारा क्रिकेटपटू ठरला. त्याने या सामन्यात ३१ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारासह नाबाद ५८ धावांची खेळी केली.
हार्दिक हा गेल्या ५ वर्षापासून भारताच्या वनडे संघाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याने ऑक्टोबर २०१६ साली भारताकडून वनडेत पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत ५८ वनडे सामने खेळले असून ११६८ धावा केल्या आहेत आणि ५५ विकेट्स घेतल्या आहेत.
मागील काही वर्षापासून करन बंधू इंग्लंड संघाचा भाग
सॅम करन आणि टॉम करन मागील काही वर्षापासून इंग्लंडचा महत्त्वाचा भाग आहेत. जेष्ठ बंधू असलेल्या टॉमने सप्टेंबर २०१७ साली इंग्लंडकडून पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत २५ वनडे सामने खेळले असून ३०३ धावा केल्या आणि २८ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच धाकटा बंधू सॅमने २०१८ साली वनडे पदार्पण केले होते. आत्तापर्यंत त्याने ६ वनडे सामने खेळले असून ३७ धावा आणि ५ विकेट्स घेतल्या आहेत.
पहिल्या वनडेत भारताचा विजय –
वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ६६ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडला ३१८ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला ४२.१ षटकात सर्वबाद २५१ धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
साता जन्माच्या गाठी! नवविवाहित बुमराह दाम्पत्याचा व्हिडिओ आला सर्वांसमोर, तुम्हीही घ्या पाहून