मंगळवारी (९ ऑगस्ट) क्रिकेटविश्वातून दु:खद बातमी पुढे आली असून क्रिकेटविश्वातील दिग्गज पंचांपैकी एक असलेले दक्षिण आफ्रिकी पंच रूडी कर्स्टन (Rudi Koertzen) यांचा कार अपघातात मृत्यू झाला. ते ७३ वर्षांचे होते. अशाप्रकारे अपघातात मृत्यू आलेले ते पहिलेच पंच नाहीत. त्यांच्यापूर्वीही एका पंचांचा असाच दुर्देवी शेवट झाला होता. त्यांना तर बॉम्बस्फोटमध्ये आपला जीव गमवावा लागला होता. हे पंच होते, अफगाणिस्तानचे दिवंगत पंच बिस्मिल्लाह जन शिनवारी.
अफगाणिस्तानचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच बिस्मिल्लाह शिनवारी यांचा ३ ऑक्टोबर २०२० रोजी अफगाणिस्तानमधील नंगरहार प्रांतात रस्त्याच्या कडेला झालेल्या बॉम्बस्फोटात जीव गेला होता. त्यावेळी ते केवळ ३६ वर्षांचे होते. नांगरहार प्रांतातील शिनवार जिल्ह्यातील एका रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमध्ये बॉम्ब होता, ज्याचा विस्फोट झाला होता.
अफगाणिस्तानचे तत्कालिन राज्यपाल यांना मारण्याचा हा कट होता. परंतु दुर्देवाने पंच बिस्मिल्लाह शिनवारी (Umpire Bismillah Shinwari) यांचा या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता. त्यांच्याबरोबरच आणखी १५ लोकांचा या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता. तर ३० लोक गंभीर जखमी झाले होते.
बिस्मिल्लाह शिनवारी यांची पंच म्हणून कारकीर्द फार छोटेखानी राहिली होती. त्यांनी ११ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचगिरी केली होती. यामध्ये ५ वनडे आणि ६ टी२० सामन्यांचा समावेश आहे. त्यांनी ७ डिसेंबर २०१७ ला अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड संघातील वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच म्हणून पदार्पण केले होते. तर २०२० मध्ये आयर्लंडमध्येच अफगाणिस्तानविरुद्ध शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी केली होती.
पंच म्हणून प्रशंसनीय राहिलीय रुडी कर्स्टन यांची कारकीर्द
दरम्यान माध्यमांतील वृत्तांनुसार, रुडी कर्स्टन गोल्फ खेळण्यासाठी गेले होते. गोल्फ खेळून झाल्यानंतर केपटाऊनमधील नेल्डन मंडेला बे स्थित आपल्या घरी परतत असताना रिव्हर्सडेल येथे त्यांच्या कारचा अपघात झाला. त्यांची कार दुसऱ्या वाहनाला जोराने धडकली, ज्यामध्ये रुडी यांच्यासह तिघांचे प्राण गेले.
रुडी हे क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्टित पंचांपैकी एक होते. त्यांनी एकूण ३३२ आंतरराष्ट्रीय सामन्यात मैदानी पंचाची भूमिका निभावली होती. यामध्ये १०८ कसोटी, २०९ वनडे आणि १४ टी२० सामन्यांचा समावेश आहे. ते बरीच वर्षे आयसीसीच्या एलिट पॅनेलचाही भाग होते. त्यांनी ९ डिसेंबर १९९२ साली भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यातून पंच म्हणून पदार्पण केले होते. कसोटी क्रिकेटमध्येही त्यांनी पहिल्यांदा भारताविरुद्धच पंचगिरी केली होती. पंच म्हणून तब्बल १८ वर्षांची कारकिर्द राहिली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
रुडी कर्स्टनच्या मृत्यूनंतर वीरेंद्र सेहवागने व्यक्त केलं दु:ख, ट्वीट करत जुन्या आठवणींना दिला उजाळा
क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी! ३३२ सामने पाहिलेला दिग्गज काळाच्या पडद्याआड
जेव्हा बलाढ्य इंग्लंडविरुद्ध तळपली होती जम्बोची बॅट, कसोटीत केला होता अजब कारनामा