आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी 10 संघांच्या सर्व खेळाडूंनी कंबर कसली आहे. मात्र, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आज नाही, तर 9 महिन्यांपूर्वीच तयारी सुरू केली होती. याचा खुलासा त्याने एका मुलाखतीमध्ये केला. त्याने दावा केला की, त्याच्या फोनमध्ये 9 महिन्यांपासून सोशल मीडियाच्या दोन ऍप्स नाहीयेत. त्याने स्पष्ट केले आहे की, विश्वचषकापूर्वी त्याला लक्ष विचलित होऊ द्यायचे नाहीये.
रोहितच्या फोनमध्ये 9 महिन्यांपासून नाहीत ‘या’ 2 ऍप्स
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तो दीर्घ काळापासून सोशल मीडियापासून दूर आहे. तो म्हणाला, “तुम्ही माझा फोन पाहा. तुम्ही हा तपासू शकता. मागील 9 महिन्यांपासून माझ्या फोनमध्ये ट्विटर किंवा इंस्टाग्राम नाहीये. जर आम्हाला कोणतीही कमर्शियल पोस्ट करायची असते, तेव्हा माझी पत्नी ते सांभाळते. या लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत. या दिवसभर फोनवर असतात. यामुळे वेळेचा आणि ऊर्जेचा अपव्यय होतो. त्यामुळे मी हे माझ्या फोनमध्ये न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, जर हे फोनमध्ये असेल, तर मी ते पाहील.”
रोहितने याच मुलाखतीत आणखी काही गोष्टींचाही उल्लेख केला. त्याच्या मते, “मी कर्णधार म्हणून इतर खेळाडूंना फक्त मैदानावरच काही बोलतो. जर ते हॉटेलमध्ये असतील किंवा इतर कोणत्या ठिकाणी, तेव्हा मी त्यांना काहीही बोलत नाही. फक्त मैदानावर सामना, प्रशिक्षण किंवा सरावादरम्यान खेळाडूंशी बोलतो. प्रत्येकाचे वैयक्तिक आयुष्य आहे आणि मी त्यात दखल देण्याचे टाळतो.”
रोहित शर्माकडे विक्रमाची संधी
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत रोहित शर्माकडे मोठा विक्रम करण्याची संधी आहे. रोहितने आतापर्यंत 2015 आणि 2019 विश्वचषकात 17 सामने खेळताना 65.20च्या सरासरीने 978 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, रोहितला विश्वचषकात 1000 धावा करण्यासाठी फक्त 22 धावांची गरज आहे. त्याने हा पराक्रम केला, तर तो विश्वचषकात 1000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज बनेल. त्याच्यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकर (2278), विराट कोहली (1030) आणि सौरव गांगुली (1006) यांच्या नावावर आहे. (before world cup 2023 rohit sharma said i dont have twitter or instagram on my phone for the past 9 months)
हेही वाचा-
आधी विराट, मग अनुष्का! विश्वचषकापूर्वी जोडप्याने तिकीटे मागण्यावरून मित्रांना केली खास अपील, स्टोरी व्हायरल
‘जगात सर्वात जास्त दबाव टीम इंडियावर…’, विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे लक्षवेधी विधान






