इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून दोन्ही संघ वनडे मालिका खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. मंगळवार पासून (२३ मार्च) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे मालिकेतील पहिला वनडे सामना होणार आहे. कसोटी, टी२० मालिकेनंतर वनडे मालिकेतही बाजी मारत विजयी घोडदौड कायम राखण्याचा यजमानांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे बॅटफूटवर असलेल्या पाहुण्यांची दौऱ्याचा गोड शेवट करण्यावर नजर असेल. अशात एक खेळाडू इंग्लंडची पराभवाची साडेसाती संपवू शकतो. हा खेळाडू म्हणजे, २९ वर्षीय अष्टपैलू बेन स्टोक्स होय.
भारताला त्यांच्याच मायभूमीत वनडे मालिकेत पराभवाची धूळ चारण्याचा पराक्रम इंग्लंडने १९८४-८५ मध्ये केला होता. यावेळी ५ सामन्यांची वनडे मालिका खेळताना इंग्लंडने ४-१ ने मालिका खिशात घातली होती. त्यानंतर इंग्लंडला भारतात एकदाही वनडे मालिका जिंकण्यात यश आले नाही. अशात इंग्लंडचा अष्टपैलू भारतीय संघाचे नमोहरण करण्याची क्षमता राखतो.
तब्बल ६०० पेक्षा जास्त दिवसांनंतर करणार पुनरागमन
कसोटी-टी२० मालिकेत लौकिकास साजेशी कामगिरी करू न शकलेला स्टोक्स वनडे मालिकेद्वारे लयीत येण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाल्याने जवळपास ६१८ दिवसांनंतर त्याचे वनडे पुनरागमन झाले आहे. २०१९ सालच्या विश्वचषकावेळी न्यूझीलंडविरुद्ध त्याने शेवटचा वनडे सामना खेळला होता. या सामन्यात त्याने नाबाद ८४ धावांची अफलातून खेळी केली होती.
बेन स्टोक्सची वनडेतील कामगिरी
स्टोक्सच्या वनडे कारकिर्दीवर नजर टाकायची झाल्यास, त्याने २०११ मध्ये आयर्लंडविरुद्ध वनडे कारकिर्दीची सुरुवात केली होती. तेव्हापासून आजवर स्टोक्सने एकूण ९५ वनडे सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ४०.६४ च्या सरासरीने २६८२ धावा चोपल्या आहेत. यात ३ शतके आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे.
फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही स्टोक्सने महत्त्वपुर्ण योगदान दिले आहे. ९५ वनडे सामन्यातील ८० डावात गोलंदाजी करताना ७० विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान ६१ धावांवर ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
भारतीय संघाविरुद्ध स्टोक्सने १४ वनडे सामने खेळले आहेत. यावेळी ७९ धावांच्या सर्वोच्च खेळीसह त्याने ३३९ धावा कुटल्या आहेत. तर कामचलाऊ गोलंदाजी करताना ७ विकेट्स चटकावल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
तिसरा डोळा! आजपासून सुरु होणाऱ्या वनडे मालिकेत ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर असणार सर्वांचेच लक्ष
…आणि कर्णधार विराट कोहली भर पत्रकार परिषदेत गाणं म्हणू लागला