इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सचे वडील मेंदूच्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. याची माहिती खुद्द बेन स्टोक्सनेच दिली आहे. ही माहिती त्याला जेव्हा कळाली तेव्हा तो एक आठवडा झोपलाही नसल्याचे त्याने सांगितले. वडिलांच्या आजारपणामुळे बेन स्टोक्सने या महिन्यात पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती.
तो म्हणाला,” माझ्या वडिलांच्या आजारामुळे माझे मन खेळात लागत नव्हते, म्हणून मी न्यूझीलंडला परत जायचे ठरवले. माझ्या वडिलांना ब्रेन कॅन्सर आहे हे मला जेव्हा समजले तेव्हा मला आठवडाभर झोप लागत नव्हती. माझे खेळण्यात मन लागत नव्हते. माझ्या वडिलांकडे न्यूझीलंडला परतण्याशिवाय पर्याय नव्हता. ”
तो पुढे म्हणाला, “खेळ मध्येच सोडून न्यूझीलंडला परत येणे हा योग्य निर्णय होता. ते नेहमी माझ्याबरोबर कडक शिस्तीत वागायचे . मी जसजसा मोठा झालो तसतसे मला याचे कारण देखील समजले. मला माहित आहे की मला एक व्यावसायिक क्रिकेटपटू व्हायचे होते आणि ते यासाठी माझी तयारी करीत होते.”
“बहुतेक लोकांचा स्वभाव त्यांच्या वयानुसार नम्र होत जातो. तथापि, कधीकधी माझ्या वडिलांनी हे करणे मला विचित्र वाटले. हा बदल ते ज्या त्रासातून जात होते त्याच्यामुळे झाला होता.” असेही तो यावेळी म्हणाला.
इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूच्या वडिलांना या वर्षाच्या सुरुवातीला ब्रेन कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. कोच बनण्यापूर्वी स्टोक्सचे वडील न्यूझीलंडकडून रग्बी खेळले. इंग्लंड संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना जोहान्सबर्ग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पोर्ट एलिझाबेथ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात स्टोक्सने १२० धावा केल्या, तेव्हा वडिलांना मेंदूचा कर्करोग झाल्याचे स्टोक्सला माहित झाले होते. स्टोक्सच्या डावामुळे इंग्लंडने तो कसोटी सामना एक डाव आणि 53 धावानी जिंकला होता.
स्टोक्सने यावर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध मँचेस्टर कसोटीत शतक ठोकले होते. मग त्याच्याकडून तीन बोटाने सलाम करण्यात आला होता. त्याने आपल्या वडिलांच्या सन्मानार्थ हे केले होते. कारण रग्बी खेळताना त्याच्या वडिलांना बोट कापावी लागली होती.
स्टोक्सने आतापर्यंत 67 कसोटी आणि 95 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 4428 आणि 2682 धावा केल्या आहेत. दोन्ही स्वरूपात त्याने एकूण 13 शतके केली आहेत.