इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला गेल्या आठवड्यात ९ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. मात्र या हंगामातील पहिल्याच आठवड्यात राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला. त्यांचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स दुखापतीमुळे आयपीएलच्या १४ व्या हंगामातून बाहेर पडला आहे. आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे की स्टोक्स लवकरच इंग्लंडला परतेल आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल. त्यामुळे इंग्लंड क्रिकेटसाठीही हा मोठा धक्का आहे.
सोमवारी(१२ एप्रिल) राजस्थान रॉयल्सकडून पंजाब किंग्स विरुद्ध खेळताना स्टोक्सच्या डाव्या हाताच्या तर्जनीला ख्रिस गेलचा झेल घेताना दुखापत झाली. त्यामुळे त्याला आयपीएलमधून बाहेर पडावे लागले. पण असे असले तरी स्टोक्सने काही काळ राजस्थान संघाला प्रोत्साहन देण्यासाठी थांबण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने त्याला शनिवारी भारतातून इंग्लंडला रवाना व्हावे लागणार आहे.
स्टोक्स तब्बल ३ महिन्यांसाठी क्रिकेटमधून राहाणार दूर
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्टोक्सच्या दुखापतीबद्दल प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे. त्यात माहिती दिली आहे की ‘इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सच्या डाव्या तर्जनीचा गुरुवारी पुन्हा एक्सरे आणि सीटी स्कॅन केल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की तो जवळपास १२ आठवड्यांसाठी क्रिकेटपासून दूर राहाणार आहे.’
तसेच प्रसिद्धी पत्रकात लिहिले आहे की ‘स्टोक्स सध्या आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्स संघासह भारतात आहे. तो शनिवारी इंग्लंडला परत येईल. सोमवारी लीड्समध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल.’
त्यामुळे स्टोक्सची ही दुखापत केवळ राजस्थान रॉयल्सलाच नाही तर इंग्लंड संघालाही धक्का देणारी ठरली आहे. कारण मे-जूनमध्ये न्यूझीलंड संघ इंग्लंड दौऱ्यावर येणार आहे. तसेच जून-जुलैमध्ये श्रीलंका संघ इंग्लंड दौरा करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
एकट्या रोहितच्या वेतनात भागतो साऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा पगार, वाचा सविस्तर