इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स बरेच महिने क्रिकेटपासून दूर आहे. ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ऍशेस मालिकेतून स्टोक्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल. मानसिक आरोग्याच्या कारणांमुळे आणि बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याने बराच काळ विश्रांती घेतली होती. स्टोक्सने त्याच्या जीवनातला एक भयावह प्रसंग सांगितला आहे. एकदा त्याच्या घशात गोळी अडकल्याने, त्याला त्याचा अंत जवळ आल्याचे वाटले होते. त्यामुळे तो खूप घाबरलेला, असा खुलासा त्याने केला आहे. एका वृत्तपत्रात लिहिलेल्या स्तंभात स्टोक्सने हा भयानक अनुभव सांगितला आहे. परंतु ही घटना केव्हा आणि कुठे घडली हे त्याने सांगितलेले नाही.
स्टोक्सने लिहिले की, ‘मी एक गोळी घेतली होती जी माझ्या घशातील नलिकेमध्ये अडकली होती. ती बाहेर काढण्यासाठी मला खूप कष्ट करावे लागले होते. ती बाहेर येईपर्यंत मला वाटले की आता माझा शेवट जवळ आला आहे. मी खोलीत एकटा होतो आणि मला श्वासही घेता येत नव्हता. हळूहळू ती गोळी विरघळली पण मला खूप भीती वाटली होती. तो एक अतिशय भीतीदायक प्रसंग होता. संघाचे डॉक्टर मला भेटायला आल्यानंतर मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला.”
बेन स्टोक्सने आणखी एका भयानक अनुभवाबद्दल सांगितले. तो म्हणाला, एकदा चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा हाताला खूप दुखू लागले. त्याने लिहिले की, ” मी तो चेंडू उचलू शकलो नाही. मला वाटले की, माझा हात मोडला आहे. हे एक बरे झाले की जेव्हा मी ड्रेसिंग रूममध्ये परत आलो तेव्हा वेदना बरी झाली. फिजिओने सांगितले केली की कोणत्याही प्रकारचे फ्रॅक्चर झालेले नाही. हॉटेलवर परत आल्यावर दिवसभरात काय झाले याचा आढावा घेतला. वेदना शांत झाल्यावर बरं वाटलं. ही गोष्ट सांगतांना मी पूर्णपणे बरा झाल्याचा आनंद आहे. परंतु आशा आहे की, माझे हे सर्व त्रास कसोटी सामन्यापूर्वी संपले आहेत.
बेन स्टोक्स शेवटचा आयपीएल २०२१ च्या पूर्वार्धात खेळला होता. या स्पर्धेतील एका सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाले होते. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानाबाहेर होता. त्याने टी२० विश्वचषक स्पर्धेतही सहभाग नोंदवला नव्हता.
पहिल्या कसोटीत स्टोक्स खेळण्यासाठी उपलब्ध असेल, असा विश्वास इंग्लंडचे व्यवस्थापकीय संचालक ऍश्ले जाइल्स यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘मला आशा आहे की तो उपलब्ध असेल. पण आपल्याला बेनची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. तो बराच काळ क्रिकेट खेळलेला नाही. मात्र, जर तो खेळण्यासाठी तयार असेल तर त्याला मैदानावर रोखणे फार कठीण जाईल.’