कोणत्याही फलंदाजासाठी ९९ धावांवर बाद होणे निराशाजनक असते, मात्र एखादा फलंदाज २९९ धावांवर बाद झाला तर त्याच्याएवढा कमनशिबी कोणीच नाही. भारतीय क्रिकेटमध्ये असे घडले असून ते सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये दिसले. यामध्ये बंगालचा फलंदाज सुदिप कुमार घरामी आंध्र प्रदेश विरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात २९९वर बाद झाला.
सुदिप हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २९९वर बाद होणारा पहिलाच भारतीय आणि जगातील तिसराच फलंदाज ठरला आहे.
सुदिपने २९९ धावांसाठी ५९६ चेंडूचा सामना केला. ज्यामध्ये त्याने ३१ चौकार आणि ६ षटकार मारले. घरामीच्या या शानदार खेळीमुळे बंगालने पहिल्या डावात ६२९ धावसंख्या उभारली.
या हंगामात सुदिम चांगलाच फॉर्ममध्ये दिसला. त्याने १२ डावांमध्ये ५४.२५च्या सरासरीने ६५१ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये २ शतके आणि ३ अर्धशतकांंचा समावेश आहे. रणजी ट्रॉफीच्या या हंगामात एकाही फलंदाजाने त्रिशतक केले नाही. यामुळे सुदिपकडे चांगली संधी होती, मात्र घडले भलतेच. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सुदिपला राशिद शेखने त्रिफळाचीत केले.
बंगाल क्रिकेट अकॅडमी, कालयानी येथे सुरू असलेल्या या सामन्यात बंगालचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरणने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये आंध्र प्रदेशचा पहिला डाव २९५ धावसंख्येवर संपला असून दुसऱ्या डावात दिवसाखेर ३ विकेट्स गमावत ६४ धावा केल्या आहेत. यामुळे त्यांना जिंकण्यासाठी २७० धावांची आवश्यकता आहे.
हा सामना जो संघ जिंकेल तो दुसऱ्या उपांत्य फेरीत जम्मू-काश्मिरचा सामना करेल. जम्मू-काश्मिर या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. तसेच पहिला उपांत्य फेरीचा सामना कर्नाटक विरुद्ध उत्तराखंड असा होणार आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २९९ धावा करणारे-
२९९* – डॉन ब्रॅडमन, ऑस्ट्रेलिया(पहिला डाव) वि. दक्षिण आफ्रिका, ऍडलेड १९३१-३२
२९९* – एसएस सुगवेकर, महाराष्ट्र (पहिला डाव) वि. मध्य प्रदेश, पुणे १९८८-८९
२९९ – मार्टीन क्रोव, न्यूझीलंड (दुसरा डाव) वि. श्रीलंका,वेलिंग्टन १९९०-९१
२९९ – मायकल पॉवेल, ग्लॅमॉर्गन (पहिला डाव) वि. ग्लोस्टरशायर, चेल्टेम, २००६
२९९ – सुदिप कुमार घरामी, बंगाल वि. आंध्र प्रदेश, कालयानी २०२६






