प्रो कबड्डीमध्ये आज दुसरा सामना बेंगाल वॉरियर्स आणि यु.पी. योद्धा यांच्यात होणार आहे. झोन बी मधील हे दोन संघ या मोसमात दोन वेळेस आपसात भिडले होते. दोन्ही वेळेस बेंगाल वॉरियर्सने विजय मिळवला होता. आज या दोन संघातील तिसरा सामना आहे.
बेंगाल वॉरियर्स संघ सध्या उत्तम लयीत आहे. या संघाने खेळलेल्या एकूण ९ सामन्यात या संघाने ५ विजय मिळवले आहेत तर दोन सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. उर्वरित दोन सामने बरोबरीत सुटले आहेत. मागील ५ सामान्यांपासून हा संघ अपराजित आहे. काल झालेल्या सामन्यात या संघाने सलग दोन वेळेस प्रो कबड्डीच्या विजेत्या पटणा पायरेट्स संघाला नमवले आहे. या संघाचे रेडर मनिंदर सिंग, जांग कुन ली आणि विनोद कुमार हे सध्या उत्तम कामगिरी करत आहेत. डिफेन्समध्ये कर्णधार सुरजीत सिंग म्हणावी तशी कामगिरी करत नसली तरी रण सिंगने डिफेन्सचा सगळा भार उत्तमरित्या पेलला आहे.
यु.पी.योद्धा संघाला घरच्या मैदानावरील सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. या संघाने खेळलेल्या ११ सामन्यात चार विजय मिळवले तर ५ सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. उर्वरित २ सामन्यात त्यांना बरोबरीत समाधान मानावे लागले आहे. या दोन संघात झालेल्या मागील सामन्यात त्यांना एका गुणाने पराभव स्वीकारावा लागला होता.
या संघाची ताकद यांचे रेडर आहेत. नितीन तोमर याच्या खेळात सातत्य आहे पण रिशांक देवाडीगा याच्या खेळात सातत्य नाही आहे. तेलुगू टायटन्स विरुद्ध या संघाने शेवटचा सामना खेळला होता. त्यात रिशांकला एकही गुण मिळवता आला नाही. या संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू राजेश नरवाल याला या मोसमात आपला ठसा उमटवता आलेला नाही.
आजच्या सामन्यासाठी बेंगाल वॉरियर्सला विजयाची जास्त संधी आहे. खेळाच्या सर्व पातळ्यांवर हा संघ उत्तम कामगिरी करत आहेत. या मोसमातील मोजक्या संतुलित संघामध्ये या संघाचा समावेश होतो. प्रो कबड्डीचा मुक्काम सध्या कोलकाता येथे आल्याने या संघाला घरेलू मैदानावर खेळण्याचा लाभ मिळतो आहे. यु.पी.संघाला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांच्या खेळाडूंना त्यांची कामगिरी उंचावावी लागेल.