प्रो कबड्डीच्या ५ व्या मोसमात बेंगलुरु बुल्सचा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असणारा संघ आहे. संघ खेळाच्या सर्व पातळ्यांवर उत्तम भासत आहे. संघाकडे उत्तम रेडर आहेत, उत्तम डिफेंडर आहेतच तर उत्तम ऑलराऊंडर खेळाडू देखील आहेत जे या संघाला मजबूत आणि विजयाचा प्रबळ दावेदार बनवतात.
बेंगलुरु बुल्स संघाकडे प्रो कबड्डीच्या तिसऱ्या मोसमात स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट ठरलेला खेळाडू रोहित कुमार आहे. रोहितने या वर्षी राष्ट्रीय पातळीवर चांगला खेळ केला असून तो प्रो-कबड्डीच्या मोसमासाठी पूर्ण तयार आहे हे दाखवले आहे. प्रो-कबड्डीच्या ४ थ्या मोसमात डू ऑर डाय रेड मध्ये कमालीचा यशस्वी ठरलेला अजयकुमार देखील संघात आहे ज्यावर प्रशिक्षक रणधीर सिंग खूप विश्वास दाखवत आहेत.
बुल्सचा संघ डिफेन्स मध्ये थोडा कमकुवत भासतो आहे खरा पण संघाकडे रविंदर पहल आहे जो याआधी प्रो कबड्डीमध्ये बेस्ट डिफेंडर राहिला आहे. बेंगलूरु बुल्स संघाची ताकद हे त्यांचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. अंकित सांगवान हा अष्टपैलू खेळाडू सध्या कमालीचा रंगात आहे, राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या अनेक मुख्य स्पर्धात तो उत्तम खेळ करत आहे तर काही स्पर्धात त्याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कारही मिळाला आहे. त्याच्या या कामगिरीवर विश्वास ठेवत बेंगलूरु बुल्स संघाच्या मालकांनी आणि प्रशिक्षकांनी त्याला यावर्षी रिटेन खेळाडू म्हणून संघात कायम केले आहे. अंकित सांगवान सह एकूण ५ ऑलराऊंडर खेळाडू बुल्सच्या संघात आहेत जे या संघाची ताकद वाढवत आहेत.
असा असेल बेंगळुरू बुल्स संघाचा संभाव्य संघ-
१ रोहितकुमार -(कर्णधार) रेडर
२ अजयकुमार -रेडर
३ गुरविंदर सिंग- रेडर
४ अंकित सांगवान- डिफेंडर(ऑलराऊंडर )
५ रविंदर पहल-राइट कॉर्नर
६ प्रितम चिल्लर- ऑलराऊंडर
७ संजय श्रेष्ठ-ऑलराऊंडर
प्रो कबड्डी ५ च्या मोसमात सर्व संघांना विजेतेपद जिंकण्याची संधी आहे पण काही संघ कमालीचे ताकदवर आणि समतोल आहेत त्यापैकी बेंगलूरु बुल्सचा संघ एक आहे. बेंगलूरु बुल्स संघात सर्विसेसचे ५ खेळाडू आहेत जे वर्षभर फक्त कबड्डी खेळत असतात, ५ ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि हा मोसमही ५ वा आहे तर यंदाचे विजेतेपद जिंकून हे खेळाडू ५ चा योग साधणार की नाही हे पाहायचे आहे.