गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात शुक्रवारी दोन वेळचा माजी विजेता चेन्नईयीन एफसी आणि एक वेळचा माजी विजेता बेंगळुरू एफसी यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. यामुळे दोन्ही संघांच्या बाद फेरी गाठण्याच्या अंधुक आशांना धक्का बसला आहे.
फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर हा सामना झाला. पहिल्या सत्रातील कोंडी निर्धारीत वेळेतही कायम राहिली.
बेंगळुरूचे सहावे, तर चेन्नईयीनचे आठवे स्थान कायम राहिले. बेंगळुरूने 16 सामन्यांत सातवी बरोबरी साधली असून चार विजय व पाच पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 19 गुण झाले. चेन्नईयीनने 16 सामन्यांत आठवी बरोबरी साधली असून तीन विजय व पाच पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 17 गुण झाले.
मुंबई सिटी एफसी 33 गुणांसह आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानचे 27 गुण आहेत. एफसी गोवा, हैदराबाद एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांचे प्रत्येकी 22 गुण आहेत.
सहाव्या मिनिटाला बेंगळुरूने चेंडूवरील ताबा गमावला. त्याचा फायदा उठवित चेन्नईयीनचा स्ट्रायकर इस्माईल गोन्साल्वीस याने आगेकूच करीत बेंगळुरूच्या बॉक्समध्ये प्रवेश केला. त्याने मारलेला फटका बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याने थोपविला. रिबाऊंडवर चेन्नईयीनचा दुसरा स्ट्रायकर रहीम अली याला संधी मिळाली. त्याचा फटका गुरप्रीतने अडखळूनही फोल ठरविला.
बेंगळुरूकडून 36व्या मिनिटाला उल्लेखनीय प्रयत्न झाला. मध्यरक्षक एरीक पार्टालू याने उजवीकडून आगेकूच करीत सहकारी मध्यरक्षक एरीक पार्टालू याला पास दिला. त्यातून सुनील छेत्रीला संधी मिळाली. त्याचा फटका चेन्नईयीनचा कर्णधार एली साबिया याने बाहेर घालविला. त्यामुळे बेंगळुरूला कॉर्नर मिळाला, पण त्यावर काही घडले नाही.
40व्या मिनिटाला चेन्नईयीनचा मध्यरक्षक लालीयनझुला छांगटे याने खाब्राला चकवून आगेकूच केली आणि मध्यरक्षक मॅन्युएल लँझरॉत याला संधी दिली. लँझरॉतने बॉक्समध्ये प्रवेश करीत गोन्साल्वीसला पास दिला, पण गुरप्रीतच्या चपळाईमुळे या चालीचे फिनिशींग होऊ शकले नाही.
दुसऱ्या सत्रात 61व्या मिनिटाला लँझरॉतने मध्य क्षेत्रात चेंडू मिळाल्यानंतर गोन्साल्वीसला पास दिला, पण गुरप्रीतने या चालीचे फिनिशींग होणार नाही याची दक्षता घेतली.
78व्या मिनिटाला गोन्साल्वीसच्या पासवर छांगटेने केलेला प्रयत्न गुरप्रीतने रोखला. त्याने डावीकडे झेपावत चेंडू अडविला.
सहा मिनिटे बाकी असताना चेन्नईयीनचा मध्यरक्षक मेमो मौरा याने संधी दवडली. त्याने मारलेला चेंडू गोलपोस्टला लागला.
संबधित बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : मुंबई सिटीची पिछाडीवरून ब्लास्टर्सवर मात
आयएसएल २०२०-२१ : ईस्ट बंगालविरुद्ध अखेर बेंगळुरूला विजय
आयएसएल २०२०-२१ : ओदीशाला हरवून जमशेदपूरच्या आशा कायम