---Advertisement---

कानाखाली मारल्याच्या घटनेतून भज्जीने कमावले 1 कोटी रुपये! श्रीसंतचा खळबळजनक दावा, हरभजनला केलं इंस्टाग्रामवर ब्लॉक

On: शनिवार, एप्रिल 25, 2026 1:31 PM
---Advertisement---

भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि एस श्रीसंथ यांच्याशी संबंधित कानाखाली मारल्याची घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. श्रीसंतने अलीकडेच दावा केला आहे की, या घटनेतून हरभजनने एक कोटी रुपये कमावले आहेत. या घटनेवरून विश्वचषक विजेत्या या दोन्ही खेळाडूंची वेळोवेळी होणारी वक्तव्ये नेहमी चर्चेत येत असतात.

आयपीएल २००८ च्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हरभजनने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या श्रीसंतच्या कानाखाली मारली होती. तेव्हा हे प्रकरण खूपच तापले होते, मात्र काही काळानंतर दोघांनी आपापसातील वाद मिटवला आणि सर्व काही ठिक असल्याचे वाटत होते. आता समोर आलेल्या नव्या माहितीनुसार, दोन्ही खेळाडूंमधील संबंध पुन्हा एकदा बिघडल्याचे कळते.

श्रीसंतने हरभजनवर आरोप केला आहे की, हरभजनने या घटनेचा फायदा उचलत एका जाहिरातीद्वारे एक कोटी रुपये कमावले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत श्रीसंतने म्हटले, “मी आतापर्यंत कोणत्याही मुलाखतीत भज्जीविषयी काहीही बोललो नाही. ही पहिलीच वेळ असणार आहे. अलीकडे आमच्यामध्ये काहीच समस्या नव्हती, मात्र त्याने त्याबद्दल एक जाहिरात बनवली. त्याने त्यातून ८० लाख ते १ कोटी रुपयांची कमाई देखील केली. नंतर त्याने मला फोन करून त्याबद्दल एक स्टोरी पोस्ट करण्यास सांगितले. मी त्याला म्हणालो, ‘मी माफ करेन पण कधीही विसरणार नाही.’ जर कोणी तुमच्याही वाईट वागले, तर तुम्ही त्याला माफ केले पाहिजे, पण कधीही ते विसरू नये. जर तुम्ही विसरलात, तर ते पुन्हा तेच करतील. तो त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. यात काही शंका नाही.”

“त्या व्यक्तीशी माझे कोणतेही नाते नाही. मी त्याला भाऊ म्हणायचो, मात्र गेल्या एक-दोन महिन्यांत त्याने ती जाहिरात केली आणि आता मी त्याला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले आहे”, असेही श्रीसंतने पुढे म्हटले आहे.

“माझ्या आई-वडिलांनी मला माफ करायला शिकवले, पण ते कधीही विसरू नका. माझ्या मनात त्याच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही आणि मला तशी गरजही नाही. तो अनेक मुलाखतींमध्ये, अगदी अश्विनसोबतही बोलतानासुद्धा त्याने माझ्या मुलीबद्दल बोलला. त्यानंतर लोकांना वाटले, तो एक चांगला माणूस आहे. तो असेलही, मात्र माझ्यासाठी, मी भारताकडून खेळेपर्यंत हे सगळे एक नाटक आहे”, असेही श्रीसंत म्हणाला आहे.

कानाखाली मारल्याच्या प्रकरणानंतर हरभजनवर संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली होती. त्या घटनेचे हाय-डेफिनिशन फुटेज मागील वर्षीच आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी प्रसिद्ध केले होते. तसेच हरभजनने श्रीसंतला मारल्याची चूक कबूलही केली होती, मात्र आता जे काही घडले (जाहिरातीबद्दल) त्या माफीला काही अर्थ नाही, असे वक्तव्य श्रीसंतने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---