मुंबई: आगरी कबड्डी महोत्सवात बोकडासाठी झालेल्या जेतेपदाच्या लढतीत भवानीमाता क्रीडा मंडळाने ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्टचा 30-19 असा सहज पराभव करून द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. भवानीमातेचा चढाईपटू सुशांत धाडवे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
प्रभादेवीच्या राजाभाऊ साळवी मैदानात उभारलेल्या किरण पाटील क्रीडानगरीत अखेरच्या दिवशी बोकड-कोंबडी पटकावण्याचा द्वंद्वाचा कबड्डीप्रेमींनी मनमुराद आनंद लुटला. भवानीमाता आणि ओम श्री साईनाथ यांच्यात झालेला अंतिम सामना पहिल्या सत्रात रंगतदार झाला.
एकेका गुणासाठी उभय संघांत चांगलीच चकमक पाहायला मिळाली. सुशांत धाडवे आणि चेतन साळवीने भवानामाता संघाला आघाडी मिळविण्यासाठी जोरदार खेळ केला तर ओम श्री साईनाथकडून सागर आगटे आणि सर्वेश लाड यांनी चांगला खेळ केला, पण मध्यंतराला खेळ थांबला तेव्हा ओम श्री साईनाथ 14-13 असा अवघ्या एका गुणाने आघाडीवर होता.
मात्र उत्तरार्धात सुशांत धाडवेने एकाच चढाईत तीन गडी बाद करून प्रतिस्पर्धी संघावर पहिला लोण लादला आणि आपली आघाडी मोठी केली. त्यातच संतोष केसरकरने काही अफलातून पकडी करून भवानीमाताला निर्णायक आघाडी मिळवून दिली.
स्पर्धेचा पुरस्कार सोहळा उपमहापौर हेमांगी वरळीकर, स्थानिक नगरसेवक समाधान सरवणकर, माजी शाखाप्रमुख महेश सावंत, आगरी कबड्डी महोत्सवाचे आयोजक दिनेश पाटील, कृष्णा पाटील आणि मिनेश पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
पुरस्काराच्या रूपाने संघांना आणि खेळाडूंना एका बोकडासह 30 कोंबड्या आणि एक खेकडा देऊन गौरविण्यात आले. त्याअगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात ओम श्री साईनाथने एकता संघाचा 32-18 असा फडशा पाडला तर भवानीमाता संघाने दुर्गामाता संघावर 24-18 असा सहज विजय मिळवित अंतिम फेरी गाठली होती.