शनिवारी (०९ एप्रिल) मुंबईच्या डॉ. डी वाय पाटील स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत झाली. या सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांना विशेष प्रदर्शन करता आले नाही. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याच्या मते हैदराबादच्या गोलंदाजी विभागाने या सामन्यात संघर्ष करण्यामागचे कारण त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आहे, जो विकेट घेण्यात अपयशी ठरत असल्यामुळे घातक दिसत नाहीय.
आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये हैदराबाद संघाची सुरुवात खराब राहिली. त्यांनी हंगामातील सुरुवातीचे २ सामने गमावले. त्यानंतर चेन्नईविरुद्धही हा संघ संघर्ष करताना दिसला. आपल्या यूट्यूब चॅनलवर या सामन्याचा प्रीव्ह्यू सांगताना चोप्राने (Aakash Chopra) हैदराबादच्या गोलंदाजीला कमजोर असल्याचे सांगितले.
तो म्हणाला की, “भुवनेश्वर (Bhuvneshwar Kumar) विकेट घेणारा गोलंदाज दिसत नाहीयत. त्याचा स्पेल १७ किंवा १८ षटकांपर्यंत संपत आहे. शेवटची २ षटके टी नटराजन आणि रोमॅरिओ शेफर्ड यांना दिली जात आहेत. यावरून स्पष्ट दिसून येते की, भुवनेश्वर डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करू शकत नाहीय. त्यामुळे त्याला सुरुवातीला आणि शेवटी १७ व्या षटकाच्या आसपास गोलंदाजी दिली जातेय. हे बरोबर नाही.”
भुवनेश्वरने चेन्नईविरुद्ध खर्च केल्या भरपूर धावा
चेन्नईविरुद्ध भुवनेश्वर केवळ एकच विकेट घेऊ शकला. ४ षटके गोलंदाजी करताना त्याने ३६ धावा खर्च केल्या आणि चेन्नईचा कर्णधार रविंद्र जडेजा याची एकट्याची एक विकेट घेतली.
उमरान मलिकवर चोप्राने केली टिका
हैदराबादचा गोलंदाज उमरान मलिक याला स्पीडस्टार म्हटले जाते. परंतु तो त्याच्या वेगामुळे प्रत्येक सामन्यात महागडा गोलंदाज सिद्ध होत आहे. त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देताना चोप्रा म्हणाला की, “उमरानमध्ये शानदार प्रतिभा आहे. तो नेहमीच सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा पुरस्कार जिंकतो. परंतु तो महागडाही ठरतो. तो २ विकेट्स घेतल्यानंतरही प्रत्येक सामन्यात जास्त धावा खर्च करतोय. वेगवान गोलंदाज सुरुवातीला त्यांच्या वेगामुळे आकर्षण बनतात, परंतु नंतर त्यांना आकड्यांवरून गणले जाते. त्याच्याकडे भरपूर क्षमता आहे, परंतु त्याने कंजूष गोलंदाजी करणे गरजेचे आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘तर या ऋतुराजला मी घरीच बसवला असता’, सीएसकेला चॅम्पियन बनवणाऱ्या दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
तीन असे खेळाडू ज्यांनी बंदीनंतरही आयपीएलमध्ये दमदार पुनरागमन करत दाखवला दम; जडेजाचाही समावेश