सध्या आयपीएल 2025चा 18वा हंगाम सुरू आहे. तत्पूर्वी, शेवटच्या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) विजेतेपदावर आपले नाव कोरले होते. तेव्हा त्या यशात युवा प्रतिभावान खेळाडू रमनदीप सिंह (Ramandeep Singh) याचाही मोठा वाटा होता. पंजाबच्या या युवा अष्टपैलू खेळाडूने संघासाठी अनेक उत्कृष्ट खेळी केल्या होत्या. त्यामुळेच मेगा लिलावापूर्वी केकेआरने त्याला आपल्या संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. केकेआरने त्याला तब्बल 4 कोटी रुपयांना रिटेन केलं. मात्र आता रमनदीपने एक खळबळजनक खुलासा केला आहे.
रमनदीपच्या म्हणण्यानुसार, मेगा लिलावापूर्वी दुसऱ्या संघांनी त्याला 9-10 कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली होती, पण त्याने केकेआरचा विश्वास न मोडता त्यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला.
रमनदीप सिंह म्हणाला की, “लिलावाआधी अनेक संघांनी माझ्याशी संपर्क केला होता. त्यांनी मला सांगितलं की रिटेन होऊ नकोस, आम्ही तुला लिलावात 9-10 कोटी रुपये देण्यास तयार आहोत. पण माझ्यासाठी प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. जेव्हा मला गरज होती, तेव्हा केकेआरने मला योग्य व्यासपीठ दिलं. मला आठवतंय, जेव्हा रिटेन्शनचा निर्णय होणार होता, तेव्हा वेंकी सरांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की तू आमच्या रिटेन्शन योजनांमध्ये आहेस, तू काय विचार करत आहेस? शेवटी हा तुझा निर्णय आहे. जर तू लिलावात गेला तर आम्ही RTMचा वापर करू. पण मी त्यांना सांगितलं की मला रिटेन होण्यात आनंद होईल. एकदा का तू लिलावात गेला, की पुन्हा त्याच संघात राहशील याची काही खात्री नसते आणि मी केकेआर सोडू इच्छित नव्हतो. काही कोटी कमी मिळाले तरी चालेल, पण त्यांचा विश्वास जपणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं.”
रमनदीप सिंहला 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) संभाव्य रिप्लेसमेंट म्हणून संघात घेतलं होतं. मात्र हार्दिक पांड्या जेव्हा आयपीएल 2024 पूर्वी गुजरात टायटन्समधून परत मुंबईकडे आला, तेव्हा रमनदीपला 5 सामन्यांनंतर रिलीज करण्यात आलं. नोव्हेंबर 2023 मध्ये पंजाबला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून देताना त्याने पुन्हा एकदा आपली छाप सोडली.
केकेआरने आयपीएल 2024 पूर्वी त्याला आपल्या संघात घेतलं. खालच्या फळीतील फिनिशर म्हणून त्याने जबरदस्त कामगिरी करत 9 डावांत 201.61च्या स्ट्राइक रेटने 125 धावा केल्या आणि विजयी हंगामात महत्त्वाची भूमिका बजावली. याच कामगिरीमुळे त्याला आयपीएल 2025 पूर्वी रिटेन केलं गेलं. मात्र सध्याच्या हंगामात तो अद्याप आपला प्रभाव पाडू शकला नाही.






