लखनौच्या बाबू बनारसी दास स्टेडियमवर शनिवारी झालेल्या लढतीत तेलगू टायटन्सने यू मुंबावर ३७-३२ असा विजय मिळवत लगातार आठ सामन्यांनंतर पहिला विजय मिळवला आहे. खूप काळ वाट बघायला लावल्यानंतर अखेर आज तेलगू टायटन्सचा राहुल चौधरी आपल्या लयमध्ये परत आला आणि त्याने १३ गुण मिळवले. त्याच्या खराब फॉर्ममुळेच तेलगू टायटन्स रेडमध्ये कमी पडत होती आणि सामने हारत होती. त्याच बरोबर राहुलला युवा बचावपटू सुबिरने ही चांगली साथ दिली आणि डिफेन्समध्ये ८ गुण घेतले.
या सामन्यात दुखापतीमुळे तेलगू टायटन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू राकेश कुमार खेळाला नाही तरी सुद्धा सामन्याच्या पहिल्या १० मिनिटातच यू मुंबा सर्वबाद झाली. ६व्या आणि १६व्या मिनिटाला कबड्डीच्या पोस्टर बॉय राहुल चौधरीने २ सुपर रेड केल्या आणि पहिल्या सत्रात तेलगू टायटन्सला बढत मिळवून दिली. पहिल्या सत्राच्या शेवटच्या काही क्षणात तेलगू चे फक्त तीन डिफेंडर मैदानांत होते आणि तेव्हा रेडला आलेल्या शबीर बापूला त्यांनी पकडून सुपर टॅकल केला.
दुसऱ्या सत्रात काशिलिंग आडकेच्या जागी नितीन मदनेला यू मुंबाकडून संधी देण्यात आली आणि यानंतर तेलगू टायटन्स लगेचच सर्वबाद होईल असे सर्वाना वाटत होते पण तेव्हाच तेलुगू टायटन्सचा युवा डिफेंडर सुबिरने दोन सुपर टॅकल केले आणि स्वतःचे डिफेन्समधील ५ गुण ही पूर्ण केले, ज्याला प्रो कबड्डी मध्ये हाय फाय म्हणतात. तेलगू टायटन्स त्यानंतर सर्वबाद झाली पण तरी सुद्धा गुणांची बढत त्यांच्याकडेच होती.
त्यानंतर सामनाचे शेवटचे काही मिनिट राहिले असताना यू मुंबा पुन्हा एकदा सर्वबाद झाली आणि त्यात कर्णधार राहुल चौधरीने स्वतःचा सुपर १० ही पूर्ण केला. राहुलच्या या कामगिरीमुळे सामना पूर्णपणे तेलगू च्या बाजूने झुकला आणि अखेर सामना तेलगू टायटन्सनेच जिंकला.