चेन्नईच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड संघात चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याची लढत अतिशय रोमांचक घडीवर आली आहे. दुसऱ्या दिवसाखेर मजबूत स्थितीत असलेला यजमान भारतीय संघ तिसऱ्या दिवशी मात्र संघर्ष करताना दिसत आहे. पाहुण्या इंग्लंडने दिवसाच्या सुरुवातीलाच चेतेश्वर पुजाराच्या रुपात पहिले यश मिळवले. त्याच्यामागोमाग काही अंतराने सलामीवीर रोहित शर्माही दुर्दैवीरित्या आपली विकेट गमावून बसला.
त्याचे झाले असे की, पुजारा बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीसोबत मिळून रोहित डावास चालना देत होता. अशात डावातील २२ वे षटक टाकण्यासाठी इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीच आला. लीचने त्याच्या षटकातील पहिलाच चेंडू इतक्या चातुर्याने टाकला की, तो टप्पा घेत सरळ मागे यष्टीरक्षक बेन फोक्सच्या हातात गेला.
यावेळी चेंडूला हिट करण्यासाठी रोहितने आपला उजवा पाय हलकासा पुढे केला. याच संधीचा फायदा घेत फोक्सने पटकन चेंडू यष्टीला लावला. त्यानंतर पंचांनाही रोहित नक्की यष्टीचीत झाला आहे का नाही, हा निर्णय घेण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घ्यावी लागली. कॅमेराचा वापर करुन नीट तपासून पाहिल्यानंतर कळाले की, अवघ्या काही अंतराने रोहितचा उजवा पाय क्रिजच्या थोडासा पुढे होता. त्यामुळे पंचांनी रोहित यष्टीचीत असल्याचे घोषित केले आणि ७० चेंडूत फक्त २६ धावा करुन रोहित पव्हेलियनला परतला.
https://twitter.com/ShubhmanC/status/1361173319349899269?s=20
या सामन्यातील पहिल्या डावातही रोहित अशाचप्रकारे बाद व्हायचा वाचला होता. मात्र यावेळी यष्टीरक्षक फोक्सने त्याला बाद करण्यात कसलीही चूक केली नाही. महत्त्वाचे म्हणजे, फोक्सचा आज (१५ फेब्रुवारी) २८ वा वाढदिवस आहे. त्यामुळे फोक्सला रोहितच्या विकेटच्या रुपात वाढदिवसाची अतिशय खास भेट मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
काय अरे पुजारा.. बॅट तरी निट पकड!! पाहा कसा विचित्र पद्धतीने बाद झालाय चेतेश्वर पुजारा
“धोनी-साहासोबत पंतची तुलना करणं बंद करा, कारण…” आर अश्विनचे मोठे विधान