इंडियन प्रीमीयर लीगमध्ये गेले दोन वर्षे एक नाव सातत्याने गाजतंय ते नाव म्हणजे शाहरुख खान. होय, शाहरुख खानचं. पण बॉलिवुडचा किंग खान नव्हे, तर तामिळनाडूचा फलंदाज शाहरुख खान. याच शाहरुख खानचा आज २७ वा वाढदिवस आहे.
शाहरुख खान पंजाब किंग्स संघातून खेळला
यंदाच्या आयपीएल सत्रात पंजाब किंग्स संघाने १८ फेब्रुवारीला झालेल्या लिलावात शाहरुख खानला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले होते. शाहरुखने तामिळनाडू क्रिकेट संघाला गेल्यावर्षी सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफी जिंकवून देण्यात फिनिशरची भूमिका पार पाडत मोलाचे योगदान दिले होते. आयपीएल लिलावावेळी बोली लावण्यासाठी शाहरुखची मूळ किंमत २० लाख इतकी होती. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीची दखल घेत पंजाब किंग्स संघाने त्याच्यावर ५.२५ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात समाविष्ट करून घेतले.
शाहरुख खाननेही आपल्या फ्रँचायझीला निराश केले नाही. हंगामात ११ आयपीएल सामने खेळताना त्याने १५३ धावा केल्या. बऱ्याचदा संघाती प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर त्याने संघाला मजबूत स्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आयपीएल २०२२ साठी तर पंजाबने त्याच्यावर ९ कोटी रुपायांची बोली लावली.
आईच्या नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार ठेवण्यात आले होते नाव
तामिळनाडू क्रिकेट संघाचा खेळाडू शाहरुख खान याला देखील बॉलिवुडचा किंग खान शाहरूख खान आवडतो. त्याचे नाव हे आईच्या एका नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार ठेवण्यात आले होते. परंतु या शाहरुखला आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. काही वर्षांपुर्वी त्याला आयपीएलमध्ये स्थान मिळण्याची अपेक्षा होती. परंतु त्याला संधी न मिळाल्याने तो खूप हताश झाला होता.
आयपीएलमध्ये संधी मिळण्याची अपेक्षा नव्हती
पीटीआयशी बोलताना शाहरुख म्हणाला होता की, “मी खरोखरच खूप निराश झालो होतो. परंतु मी स्वतला नैराश्यातून सावरले. उगाच या गोष्टीचा विचार करत बसण्याऐवजी पुढे काय करायचे, यावर लक्ष द्यायला पाहिजे. परंतु यावर्षी मला अजिबात अपेक्षा नव्हती की, मला आयपीएलमध्ये कोणी खरेदीदार मिळेल. परंतु अखेर माझे नशीब खुलले आणि मला संधी मिळाली.”
पुढे बोलताना शाहरुख म्हणाला की, “आयपीएल हा कोणत्याही क्रिकेटपटूसाठी एक मोठा मंच आहे. इथे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठमोठ्या दिग्गजांबरोबर किंवा त्यांच्याविरुद्ध खेळायला मिळते. त्यांना बोलून किंवा त्यांच्या सोबत खेळूनच तुम्हाला खूप काही शिकायला मिळते.”
सय्यद मुश्ताक अली टी -२० ट्रॉफी २०२१ मधील कामगिरी
सय्यद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध झालेल्या सामन्यात १९ चेंडूत आक्रमक ४९ धावांची खेळी करत त्याने तामिळनाडू संघाला विजय मिळवून दिला होता. तसेच बडोदा संघासोबत झालेल्या अंतिम सामन्यात त्याने ७ चेंडूत ताबडतोड १८ धावांची खेळी करत त्याने तामिळनाडू संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
किरण नवगिरेचा सोलापूरी झटका! तुफानी अर्धशतकासह ‘या’ विक्रमात ठरली नंबर वन
एकेकाळचा भारतीय संघाचा ‘पोस्टर बाॅय’ ते सतत चर्चेत राहणारा टीम इंडियाचा प्रशिक्षक
सोलापूरच्या किरण नवगिरेचा झंझावात! मारली वुमेन्स टी२० चॅलेंजमधील सर्वात वेगवान फिफ्टी