भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हा गुरुवारी (11 जानेवारी) 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. राहुल द्रविड हा महान फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. राहुल द्रविड याचा जन्म 11 जानेवारी 1973 रोजी मध्यप्रदेशातील इंदोर या शहरात झाला. या दिग्गज खेळाडूला क्रीडाविश्वात द वॉल, जॅमी, मिस्टर डिपेंडेबल या टोपणनावांनी सुद्धा ओळखले जाते.
भारतीय संघात 1996 साली सर्वात पहिल्यांदा श्रीलंकेविरुद्धच्या सिंगापुर येथील एकदिवसीय क्रिकेट सामन्यासाठी राहुल द्रविडची निवड केली होती. या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत तो चार चेंडूत तीन धावा करण्यात यशस्वी झाला होता.
साल 2005 मध्ये राहुल द्रविडची भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. राहुल द्रविडने 25 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्यांपैकी 8 सामने जिंकण्यात भारताला यश आले आहे, तर सहा सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि 11 सामने अनिर्णित राहिले.
कसोटी सामन्यांव्यतिरीक्त, द्रविडने 2000 ते 2007 दरम्यान 79 एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. यापैकी 42 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवता आला, तर 33 सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला आणि 4 सामने अनिर्णित राहिले.
द्रविडला 2000 साली 5 विस्डेन क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून सन्मानित करण्यात आले होते. तसेच 2004 साली आयसीसीच्या पहिल्या पुरस्कार सोहळ्यात द्रविडला आयसीसी ‘प्लेयर ऑफ द ईयर’ आणि ‘टेस्ट प्लेयर ऑफ द ईयर’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
द्रविडच्या नावावर क्रिकेटच्या मैदानात खूप विक्रम आहेत. या विक्रमांपैकीच एक म्हणजे कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत जगातील द्रविड हा चौथा खेळाडू आहे आणि भारताचा कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू द्रविड आहे.
भारतीय संघासाठी द्रविडने 164 कसोटी सामने खेळले असुन 286 डावांमध्ये 52.3 च्या सरासरीने 13288 धावा केल्या होत्या. कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 36 शतके तर 63 अर्धशतके आहेत. याशिवाय द्रविडने भारतीय संघासाठी 344 एकदिवसीय सामने खेळले, यातील 318 डावात 39.2 च्या सरासरीने 10899 धावा केल्या होत्या. एकदिवसीय सामन्यांमध्ये द्रविडने 12 शतके तर 83 अर्धशतके केली होती.
या दोन प्रकारांशिवाय द्रविडने भारतीय क्रिकेट संघासाठी एक टी20 सामनासुद्धा खेळला आहे. त्या सामन्यात त्याने 147.6 च्या स्ट्राईक रेटने ३१ धावा काढल्या होत्या. द्रविड हा जगातील पहिला आणि एकमेव खेळाडू आहे, ज्याने सर्व 10 कसोटी सामने खेळणाऱ्या देशाविरुद्ध शतक केले होते. कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक झेल घेणारा द्रविड हा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने कसोटी सामन्यांमध्ये 210 झेल घेतले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उपकर्णधार बनताच हार्दिकचे बदलले तेवर! दुसरी धाव असूनही पळण्यास विराटला दिला नकार, पुढे….
गोष्ट एका क्रिकेटरची भाग 1: तेव्हा ऑनर बोर्डवर नाव न लागलेल्या द्रविडने भारतीयांच्या मनात मात्र तो ऑनर मिळवलाच