भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने नुकताच आपला ३८ वा वाढदिवस साजरा केला. त्याचा जन्म जन्म ७ जुलै १९८१ रोजी रांची येथे झाला. एमएस धोनीने २००४ मध्ये स्वतःच्या जबरदस्त शैलीमुळे भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले.
एमएस धोनीने संधी मिळाल्यावर कधी मागे वळून पाहिले नाही आणि त्याने यश संपादन करून आपलं नाव मोठं केलं. धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या १४-१५ वर्षांत कमालीचे यश मिळवले आहे.
त्याने यष्टीरक्षणात, फलांजीत तसेच कर्णधार म्हणून आपली छाप पाडली. म्हणून माजी कर्णधार एमएस धोनीला भारताचाच नव्हे तर जगातील सर्वात महान खेळाडू म्हणून ओळखले जाते.
नुकताच त्याने आपला वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसा निमित्ताने तो महान खेळाडू का झाला याची पाच कारणे सांगणारा हा लेख…
१. आयसीसीच्या ३ प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार “कॅप्टन कुल” एमएस धोनीने एक कर्णधार म्हणून संपूर्ण कारकीर्दीत अनेक विक्रम नोंदवले आहेत. आपल्या नेतृत्वात त्याने भारताला जबरदस्त यश मिळवून दिले आहे.
एक कर्णधार म्हणून धोनीने असं काही केलं आहे, की जगातील क्रिकेट इतिहासात कोणताही कर्णधार करु शकला नाही. एमएस धोनीने आयसीसीच्या तिन्ही प्रतिष्ठित ट्रॉफी आपल्या कर्णधारपदी जिंकल्या आहेत. २००७ मध्ये त्याने वर्ल्ड टी-२० विश्वकप जिंकले. तर २०११ मध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्ड त्याच्या नेतृत्वात भारताने जिंकले. यानंतर २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जंकून तो जगातील तिन्ही ट्रॉफी जिंकणारा पहिला कर्णधार ठरला.
२. वनडे मध्ये ५-६ क्रमांकावरील फलंदाजीत अप्रतिम कामगिरी
धोनी फक्त कर्णधार म्हणूनच नव्हे तर एक फलंदाज म्हणून देखील यशस्वी झाला.
धोनीला विश्व क्रिकेटमध्ये “फिनिशर” या नावाने ओळखले जाते. त्याने फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाला बरेच सामने जिंकूल दिले आहेत.
वनडे मध्ये धोनीने १०,००० हून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये धोनीने ५ व ६ क्रमांकावर सर्वाधिक फलंदाजी केली. या क्रमांकावर खेळून धोनीने वनडे कारकीर्दीतील २१२ डावात ७३३३ धावा केल्या. ५-६ क्रमांकावर खेळून देखील संघासाठी तो धावा करू शकतो.
३. भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच प्रथम क्रमांक मिळविला
तस पाहता भारतीय क्रिकेटचा कसोटी इतिहास खूप जुना आहे. ८७ वर्षांपूर्वी भारताने आपला पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर संघाला बरेच महान खेळाडू व कर्णधारपद मिळाले. परंतू भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली कसोटी क्रिकेटमध्ये जे यश मिळवले ते या आगोदर कधी मिळाले नाही.
खरं तर धोनीने त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाला कसोटीमध्ये प्रथम क्रमांकावर आणले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासावर जर नजर टाकली तर ७७ वर्षानंतर भारतीय संघ प्रथम क्रमांकावर आला होता. भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वात २००९ मध्ये कसोटीत प्रथम क्रमांक मिळवला होता.
४. खेळाविषयी असलेली जबरदस्त समज
एमएस धोनी याला नक्कीच क्रिकेट मधील सर्वात हुशार खेळाडू म्हणता येईल. धोनीने आपली बुद्धिमत्ता दाखवत क्रिकेटचं जग जिंकलं. धोनीकडे खेळ समजून घेण्याची जबरदस्त कला आहे.
म्हणूनच त्याने आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत बरेच यश मिळवले आहे. कर्णधार असो वा विकेटच्या मागे असो किंवा फलंदाजी असो, धोनीने हे दाखवून दिलं की, खेळ आणि खेळाची परिस्थिती समजून घेण्याची प्रचंड क्षमता त्याच्याकडे आहे.
५. यष्टीच्या मागे चपळता
जेव्हा जेव्हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट आणि महान यष्टीरक्षकांबद्दल चर्चा होईल तेव्हा धोनीच नाव नक्की घेतलं जाईल. कारण एमएस धोनीने यष्टीरक्षक म्हणून जे यश मिळवलं आहे तसं यश कमीच यष्टिरक्षकांना मिळालं असेल.
त्याच्या विकेटकीपिंगमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याची विकेटमागील चपळता. विशेषत: धोनी फिरकी गोलंदाजी विरुद्ध चित्त्याच्या चपळाईने यष्टीमागे उभा राहतो. त्यांच्या चेंडू हातात मिळताच तो स्टंपचे बेल्स उडवतो.