१४ वर्षाखालील मुले, आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा
पुणे : लॉयला हायस्कूल, स्टेला मारीस हायस्कूल, हचिंग्ज स्कूल, सेंट व्हिन्सेंट स्कूल, सेंट पॅट्रिक्स, बिशप्स स्कूल यांनी जिल्हा क्रीडा परिषद आणि शिक्षण विभाग (पुणे मनपा) यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या गटातून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
एसएसपीएमएस मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत पाषाणच्या लॉयला हायस्कूलने बोपोडीच्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलवर ३-०ने मात केली. यात लॉयलाकडून राणाप्रताप देशमुख (८ मि.), मार्क मिल्टन (११ मि.), आर्य मुरकुटे (२१ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला. दुस?्या लढतीत अजित औटीच्या (६ व १८ मि.) दोन गोलच्या जोरावर स्टेला मारीस हायस्कूलने कोंढव्याच्या सिंहगड सिटी स्कूलवर २-०ने मात करून आगेकूच केली. यानंतर झालेल्या तिस?्या लढतीत हचिंग्ज स्कूलने औंधच्या सिटी इंटरनॅशनल स्कूलचा ४-०ने पराभव केला. हचिंग्जकडून मानस गडकरीने (५ व १० मि.) दोन, तर मानव दुणवाणी (११ मि.) आणि अभ्युद्य राठोड (१७ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
सेंट व्हिन्सेंट स्कूलने एंजल मिकी अँड मिनी स्कूलचा ७-०ने धुव्वा उडविला. यात फजल शेख (५ व ८ मि.), फ्रँकलिन नाझरथ (१६ व २० मि.), वियान मुरगोड (१८ व २१ मि.) यांनी प्रत्येकी दोन गोल केले, तर भार्गव सावंत (११ मि.) याने एक गोल केला. यानंतर झालेल्या लढतीत राजेंद्र पाठाने (१९ मि.) केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर सेंट पॅट्रिक्सने सेंट अरनॉल्डस हायस्कूलवर १-०ने मात करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. औंधच्या डॉ. श्यामराव कलमाडी हायस्कूलने विखे पाटील मेमोरियल स्कूलचा टायब्रेकमध्ये ३-२ असा पराभव केला. निर्धारित वेळेत लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. यानंतर टायब्रेकचा अवलंब करण्यात आला. यात कलमाडी हायस्कूलकडून अभिनंदन गायकवाड, श्रीतेज कुंभार, विषेश भंडारे यांनी गोल केला, तर विखे पाटील स्कूलकडून सोहम घोरपडे, दिग्विजय शिंदे यांनाच गोल करता आले. आर्यन गोसावी, ध्रुव सोनवणे, उत्कृष्ट क्षेत्री यांनी संधी वाया घालवली.
कॅम्पच्या द बिशप्स स्कूलने गुरुकुल रेंजहिल स्कूलचा टायब्रेकमध्ये ३-२ने पराभव केला. निर्धारित वेळेत लढत गोलशून्य बरोबरीत सुटल्याने टायब्रेकचा अवलंब करण्यात आला. यात बिशप्सकडून मोक्ष संघवी, आॅल्विन अब्राहम, आकाश श्रीराम यांनी गोल केले, तर गुरुकुलकडून हेमांग मेवार, प्रथमेश लखोटिया यांनाच गोल करता आले. अर्जुन जोशी, मिहीर विजय यांनी गोल करण्याची संधी वाया घालवली.
कोथरूडच्या सिटी इंटरनॅशनल स्कूलने मनपा शाळा क्रमांक ६० मुलांची संघाचा टायब्रेकमध्ये ५-४ने पराभव केला. निर्धारित वेळेत लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. त्यामुळे टायब्रेकचा अवलंब करण्यात आला. यात सिटी इंटरनॅशनलकडून प्रथमेश येवले, सुह्रद घन, नील जोशी, ओम प्रतापसिंग, गर्व श्रीवास्तव यांनी गोल केले, तर मनपा शाळेकडून कुलदीप भंडारे, मनोज गलियत, यश लोणारे, अभिषेक कांबळे यांनी गोल केले. दिक्षान्त सपकाळला गोल करण्यात यश आले नाही.