विविध कारणांनी चर्चेत राहणारे, भारतीय क्रिकेट संघाचे माजी सलामीवीर आणि पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. एका वृत्तसंस्थेनुसार, भाजप खासदार गंभीर यांनी दिल्ली पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. गंभीर यांनी दिल्ली पोलिसांना सांगितले की, मला इसिस काश्मीरकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्याचवेळी या धमकीची माहिती मिळताच पोलीसही कामाला लागले आहेत.
माजी क्रिकेटपटू गंभीर यांना मिळालेल्या धमकीची दिल्ली पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना डीसीपी श्वेता चौहान यांनी सांगितले की, ‘गौतम गंभीर यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इसिस काश्मीरकडून धमकीचा मेल आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.’ गौतम गंभीर पूर्व दिल्ली मतदारसंघातून खासदार आहेत.
सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गंभीर यांनी पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली. गंभीर प्रत्येक मुद्द्यावर त्याच्या बेधडक मतासाठी ओळखले जातात. नुकतेच काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना त्याने फटकारले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना आपला ‘मोठा भाऊ’ संबोधल्याबद्दल गंभीर यांनी सिद्धू यांच्यावर टीका केली होती. त्याचवेळी त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अयोध्या दौऱ्यावरही निशाणा साधला होता.
गौतम गंभीर हे २०११ मध्ये विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघाचे भाग होते. अंतिम सामन्यात त्यांनी ९७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. तसेच ते २००७ साली टी२० विश्वचषक जिंकलेल्या संघाचे देखील सदस्य होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी अर्धशतकीय खेळी केली होती. याशिवाय त्यांनी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधारपद सांभाळताना दोनदा संघाला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले होते. सध्या ते समालोचक म्हणून आपली दुसरी इनिंग खेळताहेत.