गेल्या काही वर्षात ‘फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम म्हणजे नदाल’, हे समीकरणच बनले आहे. पण यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये कदाचित देवालाही काहीतरी नवे पाहण्याची इच्छा झाली असेल आणि म्हणूनच त्याने पुरुष एकेरीच्या ड्रॉमध्येच काहीसा फेरफार केला. राफेल नदाल, नोवाक ज्योकोविच, रॉजर फेडरर अशा टेनिस कोर्टवरच्या तीन दिग्गजांना तराजूच्या एकाच पारड्यात टाकले. आणि गंमत बघा, विजेतेपदाच्या अंतिम लढाईआधीच यातले दोन दिग्गज, नदाल आणि ज्योकोविच उपांत्यफेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या फ्रेंच ओपनची फायनल याच दोघांमध्ये रंगली होती.
फ्रेंच ओपनच्या 13 विजेतेपदांचा ताज मिरवणाऱ्या नदालचा रस्ता यंदा मात्र खडतर बनला आहे. नाहीतर दरवर्षी लाल मातीतल्या या ग्रँड स्लॅममध्ये तो आला, तो खेळला आणि तो जिंकून गेला… ही बाब टेनिस चाहत्यांच्या सवयीची बनली होती. यंदा उपांत्यपूर्व फेरीतच अर्जेंन्टिनाच्या दिएगो श्वार्त्झमनने नदालचा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. पण अनुभव आणि ताकदीच्या जोरावर नदालने उपांत्य फेरीआधीचा हा अडसर अखेर पार केला. पण आता त्याच्यासमोर आव्हान आहे ते 18 वेळच्या ग्रँड स्लॅम विजेत्या ज्योकोविचचे.
ज्योकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून यंदाच्या ग्रँड स्लॅम मोसमाची जंगी सुरुवात केली होती. त्याच आत्मविश्वासाने फ्रेंच ओपनच्या क्ले कोर्टवर खेळताना ज्योकोविचने सुरुवातीला एकेका प्रतिस्पर्ध्याला नामोहरम केलं. अपवाद चौथ्या फेरीचा. इटलीच्या लॉरेंझो म्युसेटीने त्या सामन्यात ज्योकोविचसमोर भलतेच आव्हान उभे केले होते. पहिले दोन्ही सेट जिंकलेला म्युसेटी सामनाही खिशात घालणार असे वाटत असतानाच तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये ज्योकोविचने यशस्वी पुनरागमन केले. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये ज्योकोविचने 4-0 अशी आघाडी घेतली आणि तेव्हाच लॉरेंझोने पाठीच्या दुखापतीमुळे सामना सोडण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत सहज विजय मिळवून ज्योकोविचने उपांत्य फेरीचे तिकीट नक्की केले. आणि आता सहाव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सर्बियन टेनिसवीर सज्ज झाला आहे.
खरे तर फ्रेंच ओपन ही राफेल नदालची मक्तेदारी. याच लाल मातीत 2005 साली त्याने पहिले विजेतेपद पटकावले. त्यानंतर गेल्या 16 वर्षातला त्याचा क्ले कोर्टवरचा वावर डोळे विस्फारुन टाकणारा आहे. त्याच्या खजिन्यातली फ्रेंच ओपनची तब्बल तेरा विजेतीपदे याचीच साक्ष देतात. पण वयाची पस्तीशी गाठलेला नदाल ज्योकोविचसमोर त्याच स्फूर्तीने खेळू शकेल का? याचं उत्तर पॅरिसमध्ये आज रंगणाऱ्या उपांत्य सामन्यानंतरच मिळेल.
हे झाले दोन दिग्गजांनी भरलेल्या फ्रेंच ओपनच्या तराजूचे एक पारडे. पण जरा दुसऱ्या पारड्याकडेही जरुर लक्ष द्या. वय, अनुभव आणि आजवरचे यश या बाबतीत ही बाजू हलकी आहे. पण हो, यातल्या दोन्ही शिलेदारांकडे पारडे आपल्या बाजूने झुकवण्याची क्षमता नक्कीच आहे.
फ्रेंच ओपनची दुसरी उपांत्य लढत याच दोन शिलेदारांमध्ये म्हणजेच ग्रीसचा स्टेफानो त्सिसिपास आणि जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव यांच्यात रंगणार आहे. जागतिक क्रमवारीत अवघ्या 22 वर्षांचा त्सिसिपास पाचव्या तर 24 वर्षांचा झ्वेरेव सहाव्या स्थानावर आहे. दोघांच्याही खात्यात आजवर एकही ग्रँड स्लॅम विजेतेपद नाही. पण या दोघांमधली आजची लढत तुल्यबळ होईल यात वाद नाही.
एकीकडे 38 (20+18) ग्रँड स्लॅम विजेतीपदांची रास आणि दुसरीकडे विजेतीपदाची कोरी पाटी. फ्रेंच ओपनच्या तराजूत यंदा एकसमान असे काही नाही. पण उपांत्य फेरीच्या आजच्या लढाईत या तराजूची ही दोन्ही पारडी कुणाच्या जाण्याने हलकी होतात आणि अखेरच्या लढतीसाठी कोणाचे आव्हान बाकी उरते? हे पाहणे महत्वाचे ठरेल.
फ्रेंच ओपन
पुरुष एकेरी, उपांत्य फेरी
पहिला सामना
अलेक्झांडर झ्वेरेव (जर्मनी) वि. स्टेफानो त्सिसिपास (ग्रीस)
संध्याकाळी 6.20 वा.
पुरुष एकेरी, उपांत्य फेरी
दुसरा सामना
राफेलल नदाल (स्पेन) वि. नोवाक ज्योकोविच (सर्बिया)
रात्री. 9 वा.