-आदित्य गुंड
क्रिकेटवेड्या भारत देशामध्ये ऑलिंपिकबद्दल फारशी ममता नाहीये. अलीकडे बॅडमिंटन, कबड्डी, टेनिस अशा खेळांना लोकप्रियता मिळू लागली आहे. अशी परिस्थिती असताना हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांबाबत आपल्या देशात कितपत जागरूकता असेल याची कल्पनाच न केलेली बरी. वृत्तपत्रे आणि इतर प्रसिद्धी माध्यमेदेखील या स्पर्धांना फारसे महत्व देताना दिसत नाहीत. अगदीच कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात छोटीशी बातमी एवढ्यावर हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेचा वृत्तांत या लोकांसाठी संपलेला असतो.
अशी परिस्थिती असताना शिवा केशवन नामक युवकाने यावर्षी दक्षिण कोरियामध्ये झालेल्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सलग सहाव्यांदा भारताचे प्रतिनिधित्व केले. हिवाळी ऑलिंपिक स्पर्धादेखील असतात हेच माहित नसणाऱ्या लोकांना शिवा केशवन कोण हे माहित असणे शक्यच नाही. त्यासाठी हा ब्लॉगचा खटाटोप.
१९८१ साली मनालीमध्ये शिवाचा जन्म झाला. त्याची आई इटालियन तर वडील केरळचे होते. आईवडील मनालीमध्ये साहसी खेळांची अकादमी चालवत असत. शिवा आणि त्याचा धाकटा भाऊ देवन डॅनियल हे शिमल्याजवळ असलेल्या सनावर इथे शाळेत होते. ल्युज ह्या खेळाची लोकप्रियता वाढावी म्हणून इंटरनॅशनल ल्युज फेडेरेशनचे पदाधिकारी भारतात आले होते. त्यांनी पंचकुला येथे एक कॅम्प भरवला होता. ह्या कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी शिवाच्या शाळेने त्याला आणि त्याच्या भावाला पाठवले. त्या वेळचे ल्युज विश्वविजेते गुंतर लेमर हे त्या कॅंपमध्ये प्रशिक्षक होते. या कॅंपमध्ये शिवाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी शिवाला ऑस्ट्रियाला बोलावून घेतले. या खेळामध्ये असलेला वेग, थरार, साहस हे सगळेच शिवाला आवडले. आपण याच खेळात कारकीर्द करायची हे त्याने ठरवून टाकले.
ल्युज हा तसा धोकादायक खेळ मानला जातो. तरीसुद्धा आपल्या मुलाचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई वडिलांनी त्याला पाठिंबा दिला. भारतामध्ये तेव्हा ल्युज खेळासाठी लागणाऱ्या काहीही सुविधा नव्हत्या. त्यामुळे शिवाला सरावासाठी बाहेरच्या देशात जाऊन रहावे लागे. तेही बरेच महाग होते. कधीकधी शिवा हिमालयातील रस्त्यांवर सराव करत असे. युट्युबवर शिवा केशवन शोधले तर मनालीमधील रस्त्यांवर सराव करतानाचा त्याचा व्हिडीओ पाहायला मिळतो. क्रिकेटवेड्या देशामध्ये ल्यूजसारख्या खेळात भवितव्य घडविण्यासाठी शिवाचा आणि त्याचा कुटुंबाचा संघर्ष सुरु होता.
अखेरीस १९९८ साली वयाच्या सोळाव्या वर्षी जपान येथे झालेल्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी तो पात्र ठरला. ल्यूजमध्ये ऑलिंपिकला पात्र ठरणारा तो सगळ्यात कमी वयाचा खेळाडू आणि पहिला भारतीयदेखील होता. पहिल्या ऑलिंपिकला गेल्यावर भारतीय संघटनेने वेळेत कागदपत्रे न पोहोचविल्याने त्याला सुरुवातीला प्रवेश नाकारला गेला आणि अर्धा दिवस बाहेर बसून रहावे लागले. त्याच्याकडे स्वतःची स्लेड नसल्याने एका कोरियन खेळाडूची स्लेड घेऊन त्याला स्पर्धेत सहभागी व्हावे लागले. इतक्या सगळ्या समस्या समोर असताना शिवाकडून पदकाची अपेक्षा करणे चूकच होते. तो ऑलिंपिकसाठी पात्र ठरला हीच खूप मोठी गोष्ट होती.
शिवा कष्ट घेत होता. स्पर्धा नसतील तेव्हा त्याचा बराच वेळ पुरस्कर्ते शोधण्यामध्ये जात असे. खेळच माहीत नसेल तर पुरस्कर्ते तरी कसे पैसे देणार? अशी काहीशी परिस्थिती होती. आधी काहीतरी करून दाखव आणि मगच मदत मागायला ये, असे सल्लेही काही लोकांनी दिले. शिवाने हार मानली नाही. त्याची बायको नमिता देखील त्याच्याबरोबर ह्या कामात त्याला मदत करू लागली. २०११ साली आशियाई स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवल्यानंतरही परिस्थिती फारशी बदलली नाही. अगोदरच कुचकामी असलेल्या सरकारी यंत्रणा एका खेळाडूसाठी कितपत मदत करणार होत्या? २०१४ साली रशियामध्ये झालेल्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शिवाने क्राउड फंडिंग वापरून पैसे उभे केले. त्याने शर्यतीच्या वेळेस घातलेल्या सूटवर त्याला मदत केलेल्या ५०,००० लोकांची नावे होती. नेहमीप्रमाणे लेटलतीफ असलेल्या सरकारची मदत स्पर्धा संपल्यानंतर तीन महिन्यांनी त्याला पोहोचली.
फक्त स्पर्धेत सहभागी होण्यासाठीच नाही तर सरावासाठी देखील शिवाला पैशांची गरज होती. वर्षाचा खर्च १ करोडच्या घरात जात असे. एवढे पैसे हवेत म्हणून मग कमी सराव करणे, कमी स्पर्धांमध्ये सहभागी होणे, कमी दर्जाच्या प्रशिक्षण सुविधा वापरणे अशा तडजोडी शिवाला कराव्या लागल्या. त्याच्या कारकिर्दीच्या बऱ्याच कालावधीसाठी त्याला प्रशिक्षकदेखील नव्हता. या सगळ्या फिरतीचा एक फायदा मात्र शिवाला झाला. वेगवेगळ्या देशांत आणि वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंबरोबर सराव केल्याने शिवाने आत्तापर्यंत इटालीयन, फ्रेंच, जर्मन आणि थोडीफार जपानी अशा चार भाषा शिकल्या आहेत.
Everyone requires support in whatever they do, as a athlete I know how important fans are. Blessed to have great fan support. #ShivaFanClub, the most wonderful fan club in the world.
Thank you for the wonderful pictures @kabirghumman. #shiv6 #Olympics #Luge #PyeongChang2018 pic.twitter.com/yrqbGfywbv— Shiva Keshavan, OLY (@100thofasec) February 16, 2018
शिवाची या खेळातली क्षमता बघून २००२ साली इटलीने त्याला आपल्या देशातील प्रशिक्षण सुविधा वापरण्याचा तसेच आपल्या देशाच्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन देण्याचा प्रस्ताव दिला. अट एकच होती. शिवाने सगळ्या स्पर्धांमध्ये इटलीसाठी खेळावे. देशाभिमानी शिवाने हा प्रस्ताव धुडकावून लावला.
“माझ्या देशात या खेळाबाबत जागरूकता निर्माण करणे हे माझे ध्येय आहे आणि मी भारताकडून खेळल्यानेच ते पूर्ण होऊ शकेल याची मला खात्री आहे.” असे म्हणत शिवाने भारतात राहणे पसंत केले. आजकालच्या पैशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंच्या जमान्यात शिवाने भारतात राहण्याचा घेतलेला निर्णय निश्चितच कौतुकास्पद होता.
आपल्या मार्गात आलेल्या सगळ्या अडचणींवर मात करत शिवाने आशियाई स्पर्धेत आत्तापर्यंत चार सुवर्ण, चार रौप्य आणि दोन ब्रॉन्झ पदके मिळवली आहेत. यंदाचे हिवाळी ऑलिंपिक त्याचे सहावे आणि शेवटचे होते. याअगोदर फक्त लिअँडर पेसने शिवापेक्षा जास्त म्हणजे सात ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. आत्तापर्यंत भारताकडून हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या १३ स्पर्धकांपैकी फक्त दोन जणांनी दुसऱ्यांदा या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. यावरून शिवाचा या खेळातला मोठेपणा लक्षात यायला हरकत नाही. आपल्या अखेरच्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सहभागी होण्याच्या फक्त पंधरा दिवस अगोदर शिवाला भारतीय सरकारच्या “टारगेट ऑलिंपिक पोडियम” या योजनेअंतर्गत २० लाख रुपये मंजूर झाले. हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये गेली २० वर्षे भारताचा झेंडा फडकावत ठेवणाऱ्या शिवाला आत्तापर्यंत साधा अर्जुन पुरस्कारही मिळू नये याची खंत वाटते.
आपल्या शेवटच्या ऑलिंपिक शिवाला ३४ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. पदकासाठी विचार होण्याकरता पहिल्या विसात आलेल्या स्पर्धकांमध्ये पुन्हा एकदा स्पर्धा होते. शिवा या यादीमध्ये नसल्याने त्याचा प्रवास पहिल्याच फेरीमध्ये संपला. शिवाने हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भलेही पदक मिळवले नसेल, पण इथून पुढे भारतात जेव्हा जेव्हा हिवाळी ऑलिंपिकची चर्चा होईल तेव्हा शिवाचे नाव सगळ्यात आधी तोंडावर येईल.
At the Samsung Olympic showcase in Gangneung. #Samsung #Olympics #PyeongChang2018 #Luge 🇮🇳 pic.twitter.com/qGvvADF4Lo
— Shiva Keshavan, OLY (@100thofasec) February 12, 2018