पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने व कुंटे बुद्धिबळ अकादमी यांच्या तर्फे आयोजित पीवायसी आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्या व चौथ्या इयत्तेच्या मुले व मुलींच्या गटात बीएनएन दस्तूर प्रायमरी स्कुल व मिलेनियम नॅशनल स्कुल यांनी, तर पहिल्या आणि दुसरी इयत्तेच्या मुले व मुलींच्या गटात श्री.श्री रवी शंकर विद्या मंदीर (एसएसआरव्हीएम) या संघांनी अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील कम्युनिटी सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेत तिसऱ्या व चौथ्या इयत्तेच्या मुलांच्या गटात बीएनएन दस्तूर प्रायमरी स्कुलने 19 गुणांसह विजेतेपद, तर मिलेनियम स्कुलने उपविजेतेपद पटकावले. पटकावले. पाचव्या फेरीत आर्यन राव, आरुष धरणे, लक्ष मारलेचा, आदित्य शिंदेकर, स्वरीत सणस यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर बीएनएन दस्तूर प्रायमरी स्कुलने ब्लुरीज पब्लिक स्कुलचा 5-0असा पराभव केला.
मुलींच्या गटात मिलेनियम नॅशनल स्कुलने 22 गुणांसह विजेतेपद पटकावले. पाचव्या फेरीत इनया कठियारा, अनवेशा गोपाळे, सानवी गुजर, सई जगताप, स्वरा ताम्हणकर यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर मिलेनियम नॅशनल स्कुलने एसबी पाटील पब्लिक स्कुलचा 4-1असा पराभव केला. याच गटात बीएनएन दस्तूर प्रायमरी स्कुलने 17 गुणांसह उपविजेतेपद पटकावले.
पहिल्या आणि दुसरी इयत्तेच्या मुलांच्या गटात श्री.श्री रवी शंकर विद्या मंदीरने (एसएसआरव्हीएम) 17 गुणांसह विजेतेपद, तर शिक्षण प्रसारक मंडळी टीम 1 संघाने 15 गुणांसह उपविजेतेपद मिळवले. चौथ्या फेरीत एसएसआरव्हीएमने सिम्बायोसिस टीम 3 संघाचा 5-0असा पराभव केला. विजयी संघाकडून सार्थक देशपांडे, गौरव ठाकूरदास, दीप पेंडसे, श्रेयश जोशी, सोहम राऊत यांनी अफलातून कामगिरी केली. मुलींच्या गटात एसएसआरव्हीएमने 8 गुणांसह विजेतेपदाला गवसणी घातली. तर, शिक्षण प्रसारक मंडळीने 4 गुणांसह उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार मुले व मुलींच्या गटात यांनी पटकावला.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पदक, प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आयएम सौम्या स्वामिनाथन, पीवायसीचे मानद सचिव आनंद परांजपे आणि क्लबच्या बुद्धिबळ विभागाचे सचिव तुषार नगरकर यांच्या हस्ते करण्यात आले. विनिता क्षोत्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.