एटीके मोहन बागानने इंडियन सुपर लीग 2022-23 (आयएसएल) मध्ये बुधवारी (28 डिसेंबर) घरचे मैदान गाजवले. प्ले ऑफच्या शर्यतीत आपले स्थान अधिक मजबूत करण्याच्या शर्यतीत मोहन बागानने बाजी मारली. एफसी गोवाने पिछाडीवरून सामना बरोबरीत आणला खरा, परंतु मोहन बागानच्या दमदार खेळासमोर त्यांना प्रयत्न करूनही पराभव टाळता आला नाही. मोहन बागानकडून दिमित्री पेट्राटोस व ह्युगो बौमोस यांनी प्रत्येकी एक गोल केला अन् 2-1 असा विजय निश्चित केला. एफसी गोवाकडून अन्वर अलीने एकमेव गोल केला. या विजयानंतर मोहन बागान 23 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले.
लिस्टन कोलासोने 9व्या मिनिटाला दिलेल्या पासवर दिमित्री पेट्राटोसने मोहन बागानला आघाडी मिळवून दिली. एफसी गोवाचा गोलरक्षक धीरजला उजव्या बाजूने आलेला वेगवान चेंडू रोखता आला नाही. पेट्राटोसचा हा यंदाच्या पर्वातील पाचवा गोल ठरला. गोवाकडून पलटवार होईल असे वाटत होते, परंतु मोहन बागान घरच्या प्रेक्षकांसमोर वरचढ ठरताना दिसले. 19व्या मिनिटाला आशिष राय चेंडू घेऊन एफसी गोवाच्या पेनल्टी क्षेत्रात घेऊन गेला होता अन् त्याने गोलरक्षकालाही चकवले होते. पण, त्याने दिलेल्या पासवर गोल करण्यासाठी मोहन बागानचा अन्य खेळाडू त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता. आशिक कुरुनियनने चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु 6 यार्ड बॉक्समध्ये त्याचा तोल गेला.
अखेर गोवाकडून पलटवार झालाच. 25व्या मिनिटाला फ्री किकवरून एडू बेडियाने दिलेल्या पासवर अन्वर अलीने हलका टच करून चेंडू मोहन बागानचा गोलरक्षक विशाल कैथच्या पायामधून गोलजाळीत पाठवला. आता सामना 1-1 असा बरोबरीत आल्याने तोडीसतोड खेळ होईल, याची अपेक्षा वाढली. आता गोवाचा खेळ वरचढ होताना दिसला अन् 39व्या मिनिटात त्याच्यांकडून आघाडीचा गोल जवळपास झाला होता. चेंडू अगदी थोड्या अंतराने गोलपोस्टच्या वरून गेला. गोवाच्या अशा खेळानंतर काहीकाळी यजमान बॅकफूटवर गेले होते, परंतु पहिल्या हाफमधील अखेरच्या 5 मिनिटांत त्यांच्याकडून गोलसाठी प्रयत्न झाले. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.
Not our night at Kolkata.#ForcaGoa #UzzoOnceAgain #ATKMBFCG pic.twitter.com/a5faoU8KHK
— FC Goa (@FCGoaOfficial) December 28, 2022
मध्यंतरानंतर पहिले आक्रमण गोवाकडून झाले. इकर गौरात्स्केनाने ऑन टार्गेट प्रयत्न केला अन् तो विशाल कैथने रोखला. 52व्या मिनिटाला यजमानांनी पुन्हा आघाडी घेतली. पेट्राटोस चेंडू घेऊन पेनल्टी क्षेत्रात शिरला अन् गोवाच्या सर्व बचावपटूंचे लक्ष स्वतःकडे वेधले. अशात ह्युगो बौमोसकडे त्याने चतुराईने चेंडू पास दिला अन् त्याने सहज गोल करून मोहन बागानची आघाडी 2-1 अशी केली. 58व्या मिनिटाला आशिक कुरुनियनने मोहन बागानची आघाडी वाढवण्याचा आणखी एक प्रयत्न केला. मोहन बागानच्या खेळाचा आलेख चढा राहिला अन् गोवावर त्याचे दडपण प्रकर्षाने जाणवले. 68व्या मिनिटाला पेट्राटोसने गोल करण्याची संधी निर्माण केली, परंतु चेंडूला अंतिम दिशा देण्यात तो थोडक्यात हुकला.
75व्या मिनिटाला गोवाने बरोबरीची सोपी संधी गमावली. मोहन बागानच्या पेनल्टी क्षेत्रात गोवाचेच अधिक खेळाडू होते अन् अन्वर अलीने मारलेला चेंडू पोस्टला लागून माघारी फिरला. या सामन्यातील ही सर्वात सोपी संधी होती अन् ती गोवाने गमावली. 79व्या मिनिटाला लिस्टन कोलासोला ऑफ साईड दिला अन्यथा मोहन बागानने तिसरा गोल केलाच होता. पुढच्याच मिनिटाला लिस्टन कोलासोने केलेला प्रयत्न गोलजाळीच्या वरून गेला. 4 मिनिटांच्या भरपाई वेळेतही एफसी गोवाला बरोबरी साधता आली नाही आणि यजमानांनी 2-1 असा सामना जिंकला.
निकाल : एटीके मोहन बागान 2 ( दिमित्री पेट्राटोस 9 मि., ह्युगो बौमोस 52 मि. ) विजयी वि. एफसी गोवा 1 ( अन्वर अली 25 मि. )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मानलं गड्या! भारतीय उपखंडात अशी अद्वितीय कामगिरी करणारा एकमात्र विदेशी फलंदाज बनला विलियम्सन
डबल अटॅक! 100 व्या सामन्यात मनिष पांडेची कमाल; वॉर्नरप्रमाणेच केला धमाका