३० जानेवारी २०१७ रोजी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीवर नियुक्ती झालेल्या जेष्ठ इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी काल या पदाचा राजीनामा दिल्यावर आज भारताच्या जेष्ठ आजी माजी खेळाडूंवर हल्लाबोल केला आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांना लिहलेल्या पत्रामध्ये त्यांनी एमएस धोनी, राहुल द्रविड आणि सुनील गावसकर यांना दिल्या जाणाऱ्या विशेष वागणुकीमुळे तसेच अन्य कारणामुळे राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे.
धोनीबद्दल…
भारताचा माजी कर्णधार धोनी सध्या फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत असूनही त्याला अ श्रेणीच्या क्रिकेटपटूंमध्ये स्थान का देण्यात आले आहे. धोनीला नेहमी विशेष वागणूक का दिली जाते. अ श्रेणीमधील क्रिकेटपटूंना मोठं मानधन मिळतं. मग कमी क्रिकेट खेळणाऱ्या धोनीला ही विशेष सुविधा का?
द्रविडबद्दल….
राहुल द्रविडचं मूळ काम राष्ट्रीय संघ अ आणि युवा खेळाडूंना मार्गदर्शन करायचं असूनही आयपीएलच्या दिल्ली संघाच्या कामामुळे त्याने याकडे दुर्लक्ष केले. द्रविड हा दिल्ली डेअरडेव्हील्स संघाचा प्रशिक्षक असताना तोच भारतीय अ संघाचा तसेच कुमार संघाचाही प्रशिक्षक कसा असू शकतो असेही गुहा यांनी म्हटले आहे.
गावसकरबद्दल…
समालोचनसाठी बीसीसीआयकडून मोठं मानधन घेणारे सुनील गावस्कर हे एका खेळाडूंच्या व्यवस्थापन कंपनीचे प्रमुख आहेत याबाबतही गुहा यांनी हरकत नोंदवली आहे.
कुंबळेबद्दल…
अनिल कुंबळे राष्ट्रीय संघाचं प्रशिक्षक म्हणून उत्तम काम करत असतानाही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी त्यांच्यावर वाद निर्माण केला आहे. याबाबदलही गुहा यांनी हरकत नोंदवली आहे.
यासह गुहा यांनी तब्बल ७ मुद्द्यांवर हरकती नोंदविल्या आहेत.