चेन्नई : महाराष्ट्राच्या कबड्डी संघांना खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत शनिवारी संमिश्र यशास सामोरे जावे लागले. मुलांच्या गटात महाराष्ट्राने मध्यप्रदेशवर ४१-२६ असा शानदार विजय नोंदवित उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. मात्र, लागोपाठच्या दोन पराभवामुळे महाराष्ट्राच्या मुलींचे आव्हान साखळी गटातच संपुष्टात आले.
जवाहर नेहरू इनडोअर स्टेडियम येथे आज झालेल्या मुलांच्या गटाच्या लढतीमध्ये महाराष्ट्राने मध्यप्रदेशाला १५ गुणांच्या फरकाने पराभूत केले. मध्यंतरापूर्वी दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. मात्र, मध्यंतराला महाराष्ट्र संघाने १०-९ अशी केवळ एका गुणाची आघाडी राखली होती. मध्यंतरानंतर महाराष्ट्राच्या विकास जाधव,अनुज गावडे,गजानन कुरे यांनी आपला खेळ उंचावताना जोरदार चढाया आणि पकडी करताना ३१ गुण वसूल केले. यामुळे महाराष्ट्र संघाला मध्य प्रदेश संघावर दमदार विजय मिळविता आला.
मुलींच्या गटात महाराष्ट्राला यजमान तामिळनाडू संघाकडून ३२-४१ असा ९ गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. मध्यंतराला तामिळनाडू संघाने २१-११ अशी १० गुणाची आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर महाराष्ट्राने खेळ उंचवला परंतू तोपर्यंत हातातून विजय निसटला होता. काल हरयाणा संघाकडून व आज तामिळनाडू संघाकडून पराभूत झाल्याने मुलींच्या गटातून उपांत्य उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
तलवारबाजीत कशिश भरडला कांस्यपदक
महाराष्ट्राच्या कशिश भरड या खेळाडूने तलवारबाजीमधील सॅब्रे प्रकारातील वैयक्तिक विभागात कांस्यपदकाची कमाई केली. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील तिचे हे तिसरे पदक आहे. गतवेळी झालेल्या स्पर्धेतील वैयक्तिक व सांघिक या दोन्ही विभागात कांस्यपदक जिंकले होते. तिने नुकत्याच झालेल्या शालेय गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये दोन सुवर्णपदके जिंकली होती. त्याखेरीस तिने राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके मिळवली आहेत. कशिश ही छत्रपती संभाजीनगर येथील तलवारबाजी अकादमीमध्ये अजिंक्य दुधारे व आदेश त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. संभाजीनगर येथे पुंडलिकराव पाटील महाविद्यालयात बारावी शास्त्र विभागात शिकत आहे. (Boys reach semifinals in Kabaddi; Kashish Bharda won bronze medal in fencing)
महत्वाच्या बातम्या –
एकाच प्रकारच्या कोर्टवर अवलंबून चालणार नाही – ओ.पी.गुप्ता
पहिल्या बास्केटबॉल लीग स्पर्धेत वॉरियर्स, विझार्ड्स,लेकर्स,राप्टर संघांचा दुसरा विजय