ब्राझीलचा सर्वकालिन सर्वाधिक गोल करणारा खेळाडू नेमार ज्युनिअरने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून अधिकृतपणे निवृत्ती जाहीर केली आहे. यामुळे राष्ट्रीय संघासोबतचा त्याचा 16 वर्षांहून अधिक काळाच्या कारकिर्दीचा शेवट झाला आहे.
फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर नेमारने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला विराम दिला. ही स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये खेळली गेली, ज्यामध्ये ब्राझील अंतिम चारमध्येही पोहोचला नाही. राऊंड ऑफ 16 मध्ये नॉर्वेने त्याला 2-1 असे पराभूत करत स्पर्धेबाहेर केले होते. तो ब्राझीलचा एकमेव गोल नेमारनेच केला होता, जो त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा गोल ठरला.
नेमारने आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केली, मात्र तो क्लबकडून खेळणे सुरूच ठेवणार आहे. तो विश्वचषकासाठी पूर्णपणे फिट नसूनसुद्धा संघात सामील झाला होता. तो दोन सामन्यांमध्ये केवळ काहीच मिनिटे खेळला होता. स्पर्धा सुरू होण्याआधीच त्याच्या निवृत्तीच्या चर्चेला जोर धरला होता.
नेमारने विश्वचषकातील पराभवामुळे आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट होण्याची शक्यता आहे, असे संकेत दिले होते. त्याने आता ही निवृत्ती घोषणा कोपा सुदामेरिकानामध्ये व्हेनेझुएलाच्या युनिव्हर्सिडाड सेंट्रलवर सॅंटोसला 4-2 असा विजय मिळवून दिल्यावर केली. त्याचा सॅंटोससोबतचा करार 2026 च्या अखेरीस संपणार आहे.
नेमार निवृत्तीबद्दल म्हणाला, “राष्ट्रीय संघासोबतचा माझा प्रवास संपला आहे. मी इतिहास घडवला आहे आणि मला त्याचा खूप आनंद आहे. मी माझे रक्त, माझा जीव दिला, मी नेहमीच यलो जर्सीसाठी लढलो, मात्र आता वाटते ते पुरे झाले आहे.”
नेमारने ब्राझीलकडून 2010 मध्ये अमेरिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने खेळलेल्या 130 सामन्यांमध्ये 80 गोल आणि 59 असिस्ट नोंदवले आहे. यादरम्यान त्याने चार विश्वचषक स्पर्धा खेळल्या.
तसेच त्याने ब्राझीलसोबत 2013 मध्ये फिफा कॉन्फेरडेशन्स कप आणि 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. (Brazil star footballer Neymar Confirms International Retirement; says my time with national team in over.)






