न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलमने सोमवारी(५ ऑगस्ट) सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. तो ग्लोबल टी20 कॅनडा लीग संपल्यानंतर सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.
तो या स्पर्धेत युवराज सिंग कर्णधार असलेल्या टोरोंटो नॅशनल्स संघाकडून खेळतो. या संघाचा स्पर्धेतील साखळी फेरीचा शेवटचा सामना 7 ऑगस्टला मॉन्ट्रियल टायगर्स विरुद्ध होणार आहे. मॅक्यूलम या स्पर्धेनंतर यूरो टी20 स्लॅम स्पर्धेतही पुढे खेळणार होता. पण त्याने या स्पर्धेतून माघार घेत निवृत्ती घोषित केली आहे.
याबद्दल त्याने एक प्रसिद्धीपत्रक ट्विटरवर पोस्ट करत त्याच्या निवृत्तीचा निर्णय जाहिर केला आहे.
त्याने या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ‘मी आज मोठ्या अभिमानाने आणि समाधानाने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर करत आहे. ग्लोबल कॅनडा लीगनंतर मी निवृत्ती घेणार आहे. मी यूरो टी20 स्लॅम स्पर्धा खेळणार नाही आणि मी आयोजकांचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल आभार मानतो.’
‘मी माझ्या 20 वर्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीत जे मिळवले आहे त्याचा मला अभिमान आहे. मी या खेळात पहिल्यांदा प्रवेश केल्यानंतर स्वप्नातही विचार केला नाही एवढे यश मिळाले आहे. मला अलिकडच्या काही महिन्यात सातत्य राखणे कठिण वाटत आहे.’
आयपीएलच्या पहिल्याच मोसमातील पहिल्याच सामन्यात 158 धावांची तुफानी खेळी करणाऱ्या मॅक्यूलमने पुढे म्हटले आहे की ‘मी ज्याप्रकारे खेळलो आणि जे काही मिळवले त्याकडे मागे वळून पाहताना अभिमान वाटतो.’
‘न्यूझीलंडबरोबर, आम्ही काही मर्यादा मोडल्या आणि खेळाची एक नवी शैली स्थापन केली ज्यामुळे जगभर आम्हाला आदर मिळाला. टी20मध्ये मी अनेक आव्हानांचा आनंद घेतला. मी कोणतीही कसर सोडली नाही हे जाणून आता या खेळातून निवृत्ती घेत आहे.’
मॅक्यूलमने पुढे मीडिया आणि प्रशिक्षण यामध्ये तो कारकिर्द करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच त्याने म्हटले आहे की ‘मला आवडणारे क्रिकेट खेळणे सोडण्याबद्दल मला वाईट वाटत आहे. पण भविष्यात जे आहे त्याबद्दल मी उत्सुक आहे.’
तसेच मॅक्यूलमने त्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल कुटुंबाचे, संघ सहकाऱ्यांचे, प्रशिक्षकांचे, प्रशासकांचे, मीडियाचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.
मॅक्यूलमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून फेब्रुवारी 2016 ला निवृत्ती घेतली होती. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध फेब्रुवारी 2016 ला आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळला होता. विशेष म्हणजे या सामन्यात 54 चेंडूत शतकी खेळी करत कसोटीमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विश्वविक्रमही मॅक्यूलमने केला होता.
त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने 2015 च्या विश्वचषकात चांगली कामगिरी करताना अंतिम फेरीत धडक मारली होती. परंतू अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
यष्टीरक्षक फलंदाज मॅक्यूलमने त्याच्या कारकिर्दीत 101 कसोटी सामने खेळताना 12 शतके आणि 31 अर्धशतकांसह 6453 धावा केल्या. 260 वनडेत 6083 धावा करताना त्याने 5 शतके आणि 32 अर्धशतके केली आहेत.
त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये त्याने 71 सामन्यात 2140 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 2 शतकांचा आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये 5 व्या क्रमांकावर आहे.
याबरोबरच मॅक्यूलमने ट्वेंटी20 क्रिकेट प्रकारात 370 सामने खेळताना 9922 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 7 शतके आणि 55 अर्धशतके केली आहेत.
It’s been real… pic.twitter.com/sdCqLZTDz6
— Brendon McCullum (@Bazmccullum) August 5, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–पहिल्या ऍशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय
–कसोटीत स्टेन गन पुन्हा धडाडणार नाही; डेल स्टेनची कसोटीतून निवृत्ती
–सुरेश रैनाला मागे टाकत किंग कोहलीचा टी२० क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम