क्रिकेटजगतात काही खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीची नेहमी चर्चा होते. कारण, ही कामगिरी एका अर्थाने ऐतिहासिक अशी असते. अशा अचाट कामगिरीला चाहते कधीही विसरत नाहीत. अशीच एक कामगिरी २८ वर्षापूर्वी एजबॅस्टनच्या मैदानावर केली गेलेली आणि ही कामगिरी करणार खेळाडू होता वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार व दिग्गज फलंदाज ब्रायन लारा. आजच्या दिवशी (६ जून) बरोबर त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये कधीही न झालेली खेळी करून दाखवलेली.
लाराची ५०० धावांची खेळी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नुकतेच पाय जमविण्यास सुरुवात केलेला ब्रायन लारा याने ६ जून १९९४ मध्ये एजबॅस्टनच्या मैदानावर ५०१ धावांची ‘न भूतो’ खेळी केली होती. इंग्लिश काउंटीमधील वॉर्विकशायर संघाशी तो त्यावर्षी करारबद्ध होता. डरहॅम विरुद्धच्या त्या सामन्यात डरहॅमने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ५५६ अशी मोठी धावसंख्या उभारली होती. वॉर्विकशायरने आपला पहिला बळी केवळ ८ धावांवर गमावला. त्यानंतर फलंदाजीसाठी लाराचे मैदानात आगमन झाले. त्यानंतर जे घडले ते केवळ अकल्पनीय होते. लाराने डरहॅमच्या गोलंदाजांची पिसे काढण्यास सुरुवात केली.
दोन दिवस खेळल्या गेलेल्या या पंचशतकी खेळीत त्याने ४२७ चेंडूंचा सामना करताना ६२ चौकार व १० षटकारांच्या मदतीने नाबाद ५०१ धावा काढल्या. हा आजही प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम आहे. लाराने यानंतर २००४ मध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० धावांची खेळीदेखील केली.
https://www.youtube.com/watch?v=l3klZq-iqyM
लाराची राहिली दैदिप्यमान कारकीर्द
ब्रायन लारा याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू म्हणून गणले जाते. त्याने, आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकूण २२,३५८ धावा बनवल्या यामध्ये ५३ शतकांचा समावेश आहे. २००७ साली वेस्ट इंडीजमध्येच झालेल्या वनडे विश्वचषकानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
रहाणेच्या चपळ क्षेत्ररक्षणामागे चक्क मुंबई लोकलचा हात, स्वत: उपकर्णधारानेच केला होता गौप्यस्फोट
क्रिकेटसाठी भारत सोडून पाकिस्तानात वसलेले शिलेदार, नवव्या क्रमांकावर झुंजार शतकाची आहे नोंद
एकेवेळी ३ बाऊंसर हेल्मेटला लागल्यामुळे रडणारा खेळाडू ते भारतीय संघाचा उपकर्णधार ‘अजिंक्य रहाणे’