सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता ब्रॉ़डकास्टर ‘डिस्ने स्टार’ला आयसीसीसोबत काही वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या मोठ्या प्रसारण करारावर पुन्हा चर्चा करायची आहे.
टी20 विश्वचषक 2024 ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्ससाठी अजिबात चांगला राहिला नव्हता. आयसीसी आणि स्टार यांच्यातील 3 अब्ज डॉलरचा करार अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी20 विश्वचषकापासून लागू झाला होता. ‘क्रिकबझ’ च्या एका अहवालानुसार, स्टार स्पोर्ट्स विविध कारणांमुळे स्पर्धेच्या एकूण मूल्यांकनावर सूट देण्याची मागणी करत आहे.
अहवालानुसार, स्टारनं आयसीसीला दोन पत्रे लिहिली आहेत. गेल्या महिन्यात कोलंबो येथे झालेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेतही या मुद्द्यावर चर्चा झाली. आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी या प्रकरणी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. मात्र, अंतिम निर्णय बोर्डावर अवलंबून असेल.
स्टार स्पोर्ट्स विविध कारणांमुळे वर्ल्ड कपमध्ये 100 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 830 कोटी रुपये) पेक्षा जास्त सवलतीची मागणी करत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. ही सूट देण्याची मागणी करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे फ्लोरिडामध्ये भारत आणि कॅनडा यांच्यातील रद्द झालेला सामना असल्याचं सांगितलं जात आहे. या स्पर्धेतील भारताचे सामने इतर संघांच्या तुलनेत जास्त मूल्यवान होते.
भारत-कॅनडा व्यतिरिक्त, इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, अमेरिका विरुद्ध आयर्लंड आणि श्रीलंका विरुद्ध नेपाळ यासारखे काही सामने देखील रद्द करण्यात आले होते. तथापि, ब्रॉडकास्ट डीलमध्ये सहसा परताव्याचा सामवेश नसतो. त्यामुळे आता स्टार आयसीसीला परताव्यासाठी कितपत पटवून देण्यात यशस्वी होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
स्टार स्पोर्ट्सनं अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लो स्कोअरिंग सेमीफायनलवरही चिंता व्यक्त केली आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ 56 धावांवरच ऑलआऊट झाला होता त्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं अवघ्या 9 षटकात लक्ष्य गाठून विजय मिळवला होता.
हेही वाचा –
राहुल द्रविडच्या मुलाचा फ्लॉप शो जारी, बंगळुरूविरुद्ध संघाचा एकतर्फी पराभव
ठरलं! आयपीएल 2025 पूर्वी पंजाब किंग्ज या 5 खेळाडूंना रिटेन करणार, शिखर धवनचं भविष्य काय?
संघ मालकांकडून होत असलेल्या चुकांवर केएल राहुलचं बेधडक वक्तव्य! म्हणाला, “प्रत्येक खेळाडू…”