पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात मंगळवारपासून (२३ मार्च) ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील सर्व सामने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गंहुजे येथे होणार आहेत. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात कृणाल पंड्यालाही संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याचे वनडे पदार्पण झाले आहे.
त्यामुळे आता हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या या भावांची जोडी वनडे क्रिकेटमध्येही एकत्र खेळताना दिसणार आहे. यापूर्वी देखील भारताकडून भावांच्या जोड्या खेळल्या आहेत. त्याबद्दल या लेखातून जाणून घेऊ.
३. हार्दिक आणि कृणाल पंड्या –
हार्दिक आणि कृणाल या दोन बंधूंनी लहानपणापासून एकत्र क्रिकेट खेळताना भारतीय संघाकडून क्रिकेट खेळण्याची स्वप्ने पाहिली आहेत. अखेर त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले असून आता ते भारताकडून केवळ टी२०मध्येच नाही तर वनडे क्रिकेटमध्येही एकत्र खेळताना दिसत आहेत.
दोघांमध्ये जेष्ठ असलेल्या कृणालने भारताकडून यापूर्वी १८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने १४ विकेट्स घेतल्या असून १२१ धावा केल्या आहेत.
तसेच धाकटा भाऊ असलेल्या हार्दिकने भारताचे तिन्ही क्रिकेट प्रकारात नेतृत्व केले आहे. त्याने ११ कसोटी सामने खेळताना १७ विकेट्स घेतल्या असून ५३२ धावा केल्या आहेत. तसेच वनडेमध्ये त्याने ५७ सामन्यात ११६७ धावा केल्या आणि ५५ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने ४८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ४७४ धावा केल्या आहेत आणि ४१ विकेट्स घेतल्या आहेत.
२. मोहिंदर आणि सुरिंदर अमरनाथ
अमरनाथ हे नाव भारतीय क्रिकेटमध्ये मोठे नाव आहे. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांनी भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर त्यांची मुले मोहिंदर आणि सुरिंदर हे दोघे देखील भारताकडून काही सामने एकत्र खेळले. या दोघांपैकी सुरिंदर यांना फार जास्त संधी मिळाली नाही पण त्यांनी १० कसोटी आणि ३ वनडे सामने भारताकडून खेळले. त्यांनी कसोटीत ५५० धावा केल्या. तसेच वनडेत १०० धावा केल्या.
मोहिंदर यांनी मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले. १९८३ चा विश्वचषक जिंकण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. अंतिम सामन्यात ते सामनावीरही ठरले होते. त्यांनी ६९ कसोटीत खेळताना ४३७८ धावा केल्या. तसेच ३२ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर ८५ वनडे सामन्यांमध्ये १९२४ धावा केल्या आणि ४६ विकेट्स घेतल्या.
१. इरफान आणि युसुफ पठाण
भारताकडून आपल्या अष्टपैलू खेळाने मैदानं गाजवलेली भावांची जोडी म्हणजे इरफान आणि युसुफ पठाण. वयाने जेष्ठ असलेल्या युसुफला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यास उशीर झाला. पण इरफानने कमी वयातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या दोघांनी भारतासाठी अनेक सामने एकत्र खेळले. त्यांनी भारताकडून पहिला एकत्र सामना खेळला तो २००७ च्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात. कारण त्या सामन्यातून युसुफने पदार्पण केले होते. तर इरफान आधीच संघाचा भाग होता.
तसेच युसुफ हा २०११ साली भारतीय संघाने विजय मिळवलेल्या विश्वचषकाच्या संघाचा देखील भाग होता. इरफानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२० वनडे सामन्यात १५४४ धावा आणि १७३ विकेट्स घेतल्या आहेत. तर २९ कसोटी सामन्यात ११०५ धावा आणि १०० विकेट्सची कामगिरी केली आहे. शिवाय टी२० क्रिकेटमध्येही त्याने २४ सामन्यात १७२ धावा व २८ विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच युसुफने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ५७ वनडे सामने खेळले असुन यात २ शतके आणि ३ अर्धशतकांसह ८१० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने ४१.३६ च्या सरासरीने ३३ विकेट्सही घेतल्या. तसेत त्याने २२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना २३६ धावा केल्या असून १३ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत का इंग्लंड, वनडे मालिकेत कोण मारणार बाजी? इंग्लिश दिग्गजाने केली भविष्यवाणी
संघासाठी काहीही करण्यासाठी तयार असलेले ‘हे’ तीन खेळाडू वनडे मालिकेत होऊ शकतात मालिकावीर