---Advertisement---

जिगरबाज बेंगलोरचा केरला ब्लास्टर्सवर विजय

---Advertisement---

गोवा ३० जानेवारी : सूर गवसला की अव्वल संघांना हरवू शकतो, हे माजी विजेता बंगलोर एफसीने सिद्ध केले. हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामात शनिवारी अव्वल संघ केरला ब्लास्टर्स एफसीवर १-० असा विजय मिळवत बंगलोरने ‘टॉप फोर’ संघांमध्ये धडक मारली. सामन्यातील एकमेव आणि निर्णायक गोल बंगलोरच्या रोशन नाओरम याने केला.

टिळक मैदानावर झालेल्या ‘संडे स्पेशल’ सामन्यात निकालाची कोंडी ५६व्या मिनिटाला फुटली. पेनल्टी क्षेत्राबाहेर केरला ब्लास्टर्सच्या लालथाथांगा खावलरिंगने ‘फाउल’ केल्याने बंगलोरला फ्री किक बहाल करण्यात आली. या किकवर रोशन याने अप्रतिम सेट पिस रचताना डाव्या पायाने चेंडूला अचूक गोलजाळ्यात धाडले. नाआरेमच्या फटक्यामध्ये इतका वेग होता की, केरलाचा गोलकीपर हरमनजोत खाब्राने डाइव्ह मारली तरी काही फरक पडला नाही. उर्वरित ३४ मिनिटांमध्ये केरलाने बरोबरीसाठी प्रयत्न केले. मात्र, कालचा दिवस त्यांचा नव्हता.

तत्पूर्वी, पहिला हाफ ‘गोललेस’ ठरला तरी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले. यंदाच्या हंगामात प्रभावी आक्रमणामध्ये तिसऱ्या स्थानी राहिलेल्या बंगलोरने गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. मात्र, त्याचे गोलात रूपांतर करता आले नाही. दानिश फारूक आणि प्रिन्स इबाराने अप्रतिम चाली रचताना गोलजाळयाच्या दिशेने काही अचूक फटके मारले. मात्र, त्यांच्यासह बंगलोरचे नशीब जोरावर नव्हते.

बंगलोरप्रमाणे केरला ब्लास्टर्सनेही तेज आक्रमण करताना गोल करण्याचे खूप प्रयत्न केले. दोन्ही संघांचा बचावही मजबूत झाला. त्यामुळे आघाडी फळीचे गोल करण्याचे प्रयत्न उधळले गेले. गोलपोस्टच्या दिशेने अचूक फटके (१२-८) मारण्यासह चेंडूंचा ताबा राखण्यात (८२ टक्के-७८ टक्के) बंगलोरला यश आले. मात्र, पेनल्टी कॉर्नर मिळवण्यात प्रतिस्पर्ध्यांनी (३-२) बाजी मारली.

मागील सात सामन्यांत पराभव न पाहिलेल्या बंगलोरने कमालीचे सातत्य राखताना १४ सामन्यांतून २० गुणांसह चौथ्या स्थानी झेप घेतली. त्यांचा हा पाचवा विजय आहे. दुसरीकडे, रविवारच्या पराभवामुळे केरला ब्लास्टर्सची सलग दहा अपराजित सामन्यांची मालिका खंडित झाली. मात्र, सरस गोलफरकाच्या आधारे त्यांनी अव्वल चार संघांतील स्थान कायम राखले आहे. ताज्या गुणतालिकेत केरला ब्लास्टर्सच्या खात्यात १२ सामन्यांतून २० गुण आहेत. त्यांचा हा दुसरा पराभव आहे.

निकाल : बंगलोर एफसी १(रोशन नाओरम, ५६व्या मिनिटाला) विजयी वि. केरला ब्लास्टर्स एफसी ०.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---