---Advertisement---

दिवसा कसोटी सामना खेळून रात्री पार्कमध्ये रात्र काढायचा ‘हा’ टीम इंडियाचा भीडू

On: रविवार, जुलै 5, 2020 3:21 PM
---Advertisement---

जर आपण भारतीय क्रिकेटमधील सर्वात महान यष्टीरक्षक कोण असं जेव्हा विचार करतो तेव्हा एमएस धोनीचं नाव समोर येतं. जर सुरुवातीच्या काळातील यष्टीरक्षकांपैकी विचार केला तर फारूक इंजीनियर, सय्यद किरमानी आणि किरण मोरे यासारख्या बर्‍याच खेळाडूंची नावे घेतली जातात. खरंतर ही सर्व टीम इंडियाची शान होते.

परंतु फारुख यांच्या अगोदरही असाच एक यष्टीरक्षक भारतीय संघामध्ये होऊन गेला. ज्याने भारतीय क्रिकेटमध्ये मोठे आणि महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. बुधी कुंदरन (Budhi Kunderan) असे त्यांचे नाव होते.

वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी भारतीय संघामध्ये प्रवेश केलेल्या बुधी यांचा संपूर्ण प्रवास एका चित्रपटाच्या कथेसारखाच होता. १९६० ते १९६७ या काळात ते भारतीय संघासाठी विकेटच्या मागे उभे राहिले. तसेच ते भारताकडून १८ कसोटी सामने खेळले. यात त्यांनी ९८१ धावा केल्या आणि यष्ट्यांमागे ३० शिकार केल्या.

२३ जून २०२० रोजी त्याच बुधी कुंदरन यांची जयंती असते. चला त्यांच्या दर्जदार कारकिर्दीशी संबंधित काही रंजक किस्से पाहूया.

जेव्हा वडिलांचे कपडे घालून खेळायला गेले-

बुधी कुंदरन एका गरीब कुटुंबातून होते. त्यांचे वडील, क्रिकेटचा खेळ म्हणजे वाया जाणारा फालतू वेळ आणि पैसे या विचारांचे होते. तसेच त्या काळातील बर्‍याच कुटुंबांप्रमाणे त्यांचे वडीलही क्रिकेट खेळण्यापासून त्यांना रोखत होते.

पण जेव्हा बुधीच्या चांगल्या खेळामुळे त्याला शाळेच्या संघात निवडले गेले, तेव्हा त्यांच्या आईने बुधीच्या वडिलांचे कपडे बुधीच्या मापाचे केले आणि मैचसाठी ड्रेस तयार केला. यानंतर, इंटर स्कूल सामन्यात बुधीने प्रथमच जेव्हा हे पांढरे कपडे परिधान केले, तेव्हा त्याने २१९ धावा ठोकल्या.
दुसर्‍याच दिवशी त्याचे चित्र वर्तमानपत्रात छापून आले. त्याच्या वडिलांनी ते पाहिले आणि त्यांना आपल्या मुलाचा खूप अभिमान वाटला. यानंतर बुधी यांच्या क्रिकेट कारकिर्दीत कोणताही अडथळा आला नाही.

देशांतर्गत क्रिकेट न खेळता थेट भारतीय संघात स्थान-

बुधी हे सुरवातीच्या काळात मुंबईत क्रिकेट खेळले, पण त्यावेळी नरेंद्र ताम्हाणे हे मुंबई रणजी संघाचे यष्टीरक्षक फलंदाज होते आणि ते भारतासाठी देखील खेळत होते.

यामुळे बुधी मुंबई संघ सोडून रेल्वे संघामध्ये ट्रायल्स देण्यासाठी गेले. लाला अमरनाथ त्यावेळी रेल्वेच्या संघाचे मार्गदर्शक होते आणि त्याचबरोबर ते भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीत देखील होते. त्यांना बुधी यांचा खेळ खूप आवडला. त्यांच्यावर ते इतके प्रभावित झाले, की त्यांनी बुधी यांना रेल्वे संघाऐवजी थेट भारतीय संघात खेळण्याची ऑफर दिली.

पण त्यावेळी बुधी यांच्याकडे ना स्वतःचे ग्लोव्हस ना पॅड्स होते. त्यावेळी भारतीय संघाचे यष्टिरक्षक नरेंद्र ताम्हाणे यांनी मोठ्या मनाने बुधी यांना त्यांची किट बॅग दिली.

रात्र पार्कमध्ये आणि दिवसा मैदानावर-

बुधी यांचा पदार्पणाचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध मुंबईतील ब्राबोर्न क्रिकेट स्टेडियमवर होता. हा तो भारतीय क्रिकेटचा काळ होता, जेव्हा स्थानिक खेळाडूंना भारतीय संघासह हॉटेलमध्ये राहण्यास मनाई होती. सामन्याच्या आदल्या रात्री बुधी त्यांच्या घरी होते. त्यांचे घर मार्केट गेट परिसरातील चाळीत होते. परंतु भारतीय संघामधली ही पहिली संधी म्हणून समजा किंवा अस्वस्थतेच कारण. काहीही असले तरी त्यांना सामन्यापूर्वीच्या रात्री झोप लागत नव्हती.

यामुळे त्यांनी उशी व चादर घेऊन थेट मुंबईतील विक्टोरिया पार्क गाठलं. तेव्हा त्यांना पुर्ण रात्र मच्छरांनी त्रास दिला. सकाळ होताच त्यांनी परत भारतीय संघाबरोबर मैदान गाठले. त्यापुर्वीच्या सामन्यातच त्यांनी जवळपास १५० षटकं यष्टीरक्षण केले होते. तेव्हा कुणाला याचा अंदाजही नव्हता की महारथी रोज पार्कमध्ये झोपत आहे.

बुधी उधारीचे सामान घेऊन खेळले भारतासाठी क्रिकेट-

कारकिर्दीच्या दुसर्‍या डावात बुधी यांना कर्णधार रामचंद्र यांनी तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली. पण ते फक्त ३ धावा करून इयान मॅककिफच्या चेंडूवर हिट विकेट बाद झाले.

हा सामना होईपर्यंत त्याच्याकडे किट बॅग व सामानही नव्हते. नरेंद्र ताम्हाणे यांचे ग्लोव्हस घालून ते यष्टिरक्षण (Wicketkeeping) करत होते. तर जी टोपी घालून ते खेळात होते ती टोपी त्यांना भारदा हायस्कूलचे मुख्याध्यापक बेहराम मुर्ज़बान यांनी दिली होती. त्याचबरोबर खेळताना त्यांनी वापरलेली बॅट आणि पॅड हे देखील त्याच्या फोर्ट विजय क्लबकडून मिळाले होते.

मद्रास येथे खेळल्या गेलेल्या पुढच्या सामन्यात कर्णधार रामचंद्र यांनी त्यांना थेट डाव सुरू करण्यासाठी पाठवले. कारण भारतीय क्रिकेटचा तो असा काळ होता, की जेव्हा कर्णधार सलामीला कोणाला पाठवायचं याचा विचार जास्त करायचा, तेव्हा ते सर्वप्रथम यष्टीरक्षकांकडे पाहत असत.
या सामन्यात बुधी यांनी १२ चौकारांसह ७१ धावांचा शानदार खेळी खेळला आणि १११ च्या धावसंख्येवर तिसरी विकेट म्हणून बाद झाले. पण बुधी बाद होताच संपूर्ण भारतीय संघ डेविडसन आणि रिची बेनॉयसमोर केवळ १४९ धावांवर ढेपाळला.

इंग्लंड विरुद्ध केलेला विक्रम ५० वर्षे कोणी मोडला नाही

कुंदरन हे भारताचे पहिले असे खेळाडू होते की, त्यांनी पहिले कसोटी सामने खेळले आणि नंतर रणजी करंडक सामने खेळले. यासह ते रणजीमध्ये पहिले दुहेरी शतक झळकावणारे फलंदाजही ठरले. भारतीय क्रिकेटमध्ये आक्रमक यष्टीरक्षकाचा ट्रेंड सुरू करणारे कुंदरन हे पहिले यष्टिरक्षक फलंदाज होते.

१९६३-६३ मध्ये मद्रासमध्ये इंग्लंडच्या वेगवान हल्ल्यासमोर कुंदरन यांनी १९२ धावांची शानदार खेळी केली. जवळपास ५० वर्षांपर्यंत, कोणत्याही भारतीय यष्टीरक्षकाला ही धावसंख्या मोडीत काढता आली नाही. धोनीने चेन्नईत २२४ धावा करून तो विक्रम मोडला. बुधीने या खेळीत ३१ चौकार मारले होते. चौकाराचा हा विक्रम व्हीव्हीएस लक्ष्मणने ३८ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध मोडला होता.

या मालिकेत बुधी चांगले खेळले. दिल्ली कसोटीत त्यांनी शतक झळकावले. कानपूरमध्ये असताना त्यांनी ५५ धावांची खेळी साकारली. या संपूर्ण मालिकेत त्यांनी ५०० धावा केल्या आणि एका मालिकेत ५०० धावा करणारे क्रिकेट इतिहासातले ते पहिले यष्टीरक्षक बनले.

बुधी यांना संघातून वगळल्यानंतर

फारुकाने इंजीनियर यांनी भारतीय संघात प्रवेश केला आणि कोणाला संघात स्थान द्यावं यावरून चर्चा सुरु झाली. दोघे एकत्र खेळण्यापर्यंत त्यांच्यात अशी स्पर्धा होत होती, की कोण प्रेक्षकांचे अधिक मनोरंजन करू शकेल.

१९६७ मध्ये संघामधून सुट्टी मिळाल्यानंतर बुधी पुन्हा कधीही संघात परतले नाही. पण संघामधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी संघाच्या अधिकाऱ्यांकडे आणि बोर्डाकडे प्रश्न उपस्थित केले. खेळाडूंना असं वागवलं जातं की, खेळाडू अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार संघात खेळत आहेत. त्यांच्या या टिप्पणीमुळे बोर्डाशी त्यांचा वाद झाला.

त्यानंतर ते ग्लासगो येथे शिफ्ट झाले आणि १९७० मध्ये स्कॉटलंडमधील स्कॉटिश लीग ड्रंपेलियरबरोबर करार केला. ८० च्या दशकात, ते स्कॉटलंड क्रिकेट संघाकडून बेन्सन आणि हेजेज चषकातही खेळले.

यानंतर, ते स्कॉटलंडमध्ये ड्रमपेलियरसाठी वयाच्या ५६ व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळत राहिले, जो १९९५ पर्यंत स्कॉटलंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रदीर्घ काळ होता. २००६ मध्ये, बुधी फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे ग्लासगो येथे मरण पावले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---