भारतीय महिला संघाचा इंग्लंड दौरा यशस्वी राहिला. उभय संघातील तीन सामन्यांची वनडे मालिका शनिवारी (24 सप्टेंबर) संपली. भारतीय संघाने ही मालिका इंग्लंडला व्हाईट वॉश देत आपल्या नावे केली. दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना होता. झुलनने यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती आणि संघाने तिची निवृत्ती नेहमी लक्षात राहण्यासारखी बनवली. भारतीय संघाने तिचा अखेरचा सामना संस्मरणीय बनवला. तिच्या निवृत्तीनंतर आता क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालनेही (कॅब) तिचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.
कॅबचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी आम्ही ईडन गार्डन्सवरील एका स्टॅंडला झूलनचे नाव देणे विषयी विचार करत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले,
“आम्ही ईडन गार्डन्सच्या स्टँडला झूलनचे नाव देण्याचा विचार करत आहोत. ती एक खास क्रिकेटर असून तिच्या नावाची नोंद क्रिकेटच्या इतिहासात झालीये. आवश्यक परवानग्यांसाठी आम्ही लष्कराशी संपर्क साधू. आम्ही असोसिएशनच्या वर्धापनदिनी तिच्यासाठी विशेष सत्कार समारंभाची योजना आखत आहोत.
कॅबमध्ये आम्ही महिला क्रिकेटला समान महत्त्व देतो. ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करतेय. मात्र, तिने महिला आयपीएल खेळावे अशी आमची इच्छा आहे.”
झूलन देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करते. ती पश्चिम बंगालमधील चकदा शहराची निवासी असल्याने, तिला चकदा एक्सप्रेस या नावाने देखील ओळखले जाते.
झूलन गोस्वामी ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज आहे. तिच्या नावावर 353 बळी जमा आहेत. आपल्या वीस वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत तिने अनेक महत्त्वपूर्ण विजयात योगदान दिले. तसेच, काही काळ ती भारतीय संघाची कर्णधार देखील राहिली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कुलदीपच्या जाळ्यात अडकला न्यूझीलंड संघ, फिरकी गोलंदाजासमोर फलंदाजांचे लोटांगण
कॅप्टन अजिंक्य रहाणेचा संघ बनला चॅम्पियन! ठरली दुलीप ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात ‘यशस्वी’ टीम
तिसऱ्या टी20साठी रिषभ पंतचा पत्ता कट? जाणून घ्या कारण आणि भारताची संभावित प्लेईंग 11