भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका सुरू होणार आहे. मात्र या मालिकेपूर्वी यजमानांना मोठा धक्का बसला.
वास्तविक, संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन यानं त्याच्या पाठीच्या स्ट्रेस फ्रॅक्चरची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो भारताविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर पडणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं पुष्टी केली की, ग्रीनला यातून बरं होण्यासाठी किमान सहा महिने लागतील. या शस्त्रक्रियेमुळे तो जानेवारीमध्ये होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यातूनही बाहेर होऊ शकतो.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या म्हणण्यानुसार, “अष्टपैलू कॅमेरून ग्रीननं पाठीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. स्कॅनमध्ये त्याच्या पाठीत एक अनोखी समस्या आढळून आली, ज्यामुळे त्याची दुखापत वाढत आहे. या शस्त्रक्रियेमुळे तो भारताविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतून बाहेर पडला. त्याला यातून सावरण्यासाठी सहा महिने लागतील.”
कॅमरून ग्रीन संपूर्ण मालिकेतून बाहेर पडणं, हा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का आहे. कारण ग्रीन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही योगदान देऊ शकतो. तो बाहेर पडल्यामुळे ऑस्ट्रेलियाला आपली योजना बदलावी लागणार आहे. ग्रीन संघात नसल्यामुळे स्टीव्ह स्मिथ पुन्हा एकदा त्याच्या नियमित चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. अशा परिस्थितीत उस्मान ख्वाजाचा सलामीचा जोडीदार म्हणून मॅथ्यू रेनशॉ, मार्कस हॅरिस किंवा कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्यापैकी एकाची निवड होऊ शकते.
जर ऑस्ट्रेलियाला ग्रीनच्या जागी अष्टपैलू खेळाडू संघात आणायचा असेल, तर अनकॅप्ड ॲरॉन हार्डी किंवा ब्यू वेबस्टर हे देखील चांगले पर्याय आहेत. ऑस्ट्रेलियानं भारताविरुद्ध मायदेशात सलग दोन कसोटी मालिका गमावल्या आहेत. तर कांगारूंनी 2014 पासून भारताविरुद्ध एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. अशा परिस्थितीत ग्रीन बाहेर पडणे हा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का आहे.
हेही वाचा –
भारताला करावी लागेल पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना, वर्ल्ड कप सेमीफायनलचं समीकरण जाणून घ्या
IND vs NZ; कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंड प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य! म्हणाले, “भारतीय संघातील…”
सचिन-द्रविडचा ‘हा’ लाजिरवाणा रेकाॅर्ड, जो कोणताही फलंदाज मोडण्याचे स्पप्नही नाही पाहणार