प्रो कबड्डीचा मुक्काम सध्या नागपुरात आहे आणि नागपूर हे बेंगलुरु बुल्सचे या मोसमाचे होम ग्राऊंड आहे. आज बुल्स आणि तेलुगू टायटन्स एकमेकांसमोर उभे असणार आहेत. तेलुगू टायटन्सने सहा सामने खेळले आहेत. पहिला सामना जिंकल्यावर त्यांना सलग ५ पराभवांना सामोरे जावे लागले होते तर बेंगलुरु बुल्सला पहिल्या दोन विजयानंतर सलग दोन सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे.
या मोसमात हे दोन संघ अगोदर एक वेळेस आमनेसामने झाले होते त्यावेळी बेंगलुरु बुल्सने सामना ३१-२१ अश्या मोठ्या फरकाने जिंकला होता. पण या वेळेस सामन्याचे चित्र बदलू शकते कारण तेलुगू टायटन्सला पुरेशी विश्रांती मिळाली असून तो संघ मागील पराभव विसरून चांगला खेळ करण्याच्या प्रयत्नात असेल. त्यांचे अगोदरचे सर्व सामने सलग असल्याने त्यांना आपल्या चुकांवर विचार आणि आचरणात आणायला वेळ मिळत नव्हता पण आता विश्रांतीमुळे त्यांना वेळ मिळाला असून ते नवीन उमेदीने या सामन्यात उतरतील. राहुल चौधरी आणि राकेश कुमार यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा असणार आहे.
बेंगलुरु बुल्ससाठी हा सामना जिंकणे खूप महत्वाचे असणार आहे कारण मागील दोन सामन्यात त्यांना पराभव सहन करावा लागला होता. बेंगलुरु बुल्सला त्याचा रथ विजयी मार्गावर आणण्यासाठी खेळ उंचवावा लागणार आहे. रोहितकुमार वगळता त्यांच्या अन्य कोणत्याही खेळाडूला मागील काही सामन्यात छाप पाडता आलेली नाही आहे. अजय कुमारला त्याच्या नावाला न्याय देता आलेला नाही आणि त्याचा फटका हा पूर्ण बेंगलुरु बुल्सच्या रेडींग डिपार्टमेंटला बसत आहे. रविंदर पहल मागील सामन्यात जरी खेळला असला तरी तो पूर्णपणे तंदरुस्त नाही. आशिष सांगवान याला प्रशिक्षक रणधीर सिंग यांनी रिटेन केले होते तो काही मोठी कमाल करू शकला नाही.
या स्पर्धेत आपली दावेदारी मजबूत करण्यासाठी हा सामना बेंगलुरु बुल्सला जिंकावाच लागेल. अन्यथा त्यांची परिस्थिती तेलुगू टायटन्स संघासारखी होऊ शकते. बेंगलुरु बुल्सला हा सामना जिंकण्याची जास्त संधी असली तरी त्यांना कबड्डीच्या सर्व पातळ्यांवर उत्तम खेळ करावा लागणार आहे.