क्रिकेटप्रेमींना विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील सामन्याची प्रतीक्षा लागली आहे. उभय संघातील हा सामना चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने भारतीय संघ कशी तयारी करतोय आणि शुबमन गिल याच्या फिटनेसविषयी प्रतिक्रिया दिली आहे. चला तर, रोहित काय म्हणालाय जाणून घेऊयात…
भारतीय संघाला झटका!
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने संघाच्या तयारीविषयी भाष्य करत म्हटले की, “आमच्या संघातील खेळाडूंचा मूड शानदार आहे. आमची चांगली तयारी झाली आहे. आमच्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास दिसत आहे.” याव्यतिरिक्त रोहितने शुबमन गिल (Shubman Gill) याच्या फिटनेसविषयी भाष्य केले. रोहित म्हणाला की, “शुबमन गिल 100 टक्के फिट नाहीये. खरं तर, गिल आजारी आहे. आमचे लक्ष गिलच्या फिटनेसवर आहे.”
खरं तर, भारतीय संघ व्यवस्थापनासाठी गिलचा फिटनेस चिंतेची बाब बनली आहे. कारण, गिल सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. आशिया चषक 2023 स्पर्धेनंतर तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही चमकला होता. मात्र, आता विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापूर्वीच भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर येत आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअममध्ये (एमए चिदंबरम) खेळला जाणार आहे. यानंतर भारतीय संघापुढे 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तान संघाचे आव्हान असणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर खेळला जाईल. भारतीय संघ आपल्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भिडेल. भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामना 14 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. रोहितच्या नेतृत्वातील भारतीय संघ अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये पाकिस्तानचा सामना करेल. संपूर्ण क्रिकेटविश्व या सामन्याची वाट पाहत आहे. (captain rohit sharma on indian cricket team and shubman gill world cup 2023)
हेही वाचा-
World Cup 2023: अफगाणिस्तानने टेकले बांगलादेशसमोर गुडघे, मेहिदी हसनची अष्टपैलू कामगिरी
‘एक पराभव आमचं काहीही…’, न्यूझीलंडविरुद्ध दारुण पराभव होताच इंग्लंडच्या विश्वविजेत्या कर्णधाराचे बडेबोल