मागील हंगामाचा उपविजेता ठरलेला राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. मात्र, दुसऱ्याच सामन्यात त्यांना बुधवारी (दि. 5 एप्रिल) पंजाब किंग्सविरुद्ध 5 धावांनी नजीकचा पराभव पत्करावा लागला. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात राजस्थानकडून फलंदाजीला सातव्या क्रमांकावर उतरणारा आर अश्विन पंजाबविरुद्ध चक्क सलामीला उतरला होता. यामुळे चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या. शेवटी पंजाबविरुद्ध पराभूत झाल्यावर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने यामागील कारण सांगितले.
गुवाहाटी येथे झालेल्या आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेच्या आठव्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने चुकीचा ठरवत कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या नाबाद 86 आणि प्रभसिमरन सिंग याच्या 60 धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर 4 विकेट्स गमावत 197 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने संजू सॅमसन (Sanju Samson) 42, शिमरॉन हेटमायर (36) आणि ध्रुव जुरेल याच्या नाबाद 32 धावांच्या जोरावर 7 विकेट्स गमावत फक्त 192 धावाच केल्या. यावेळी पंजाबकडून नेथन एलिस याने राजस्थानच्या सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
या सामन्यात राजस्थानकडून जोस बटलर याला डावाची सुरुवात करता आली नाही. त्यामुळे देवदत्त पडिक्कल याच्या जागी आर अश्विन (R Ashwin) याला सलामीला संधी देण्याबाबत संजू सॅमसन याला सामन्यानंतर विचारणार करण्यात आली. यावेळी संजू म्हणाला की, “जोस फिट नव्हता. झेल घेतल्यानंतर त्याच्या बोटाला टाके लागले होते. पडिक्कलकडून डावाची सुरुवात न करण्यामागील विचार हा होता की, त्यांच्याकडे दोन स्पिनर आहेत, ज्यातील एक डावखुरा आहे आणि एक लेग स्पिनर आहे. आम्हाला मधल्या षटकात डावखुऱ्या हाताचा फलंदाज हवा होता.”
सामन्यात 15 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 32 धावांची वादळी खेळी करणाऱ्या ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) यावरही संजू खुश झाला. तो म्हणाला की, “तो मागील दोन हंगामांपासून आमच्यासोबत आहे. आम्ही खरंच खूप खुश आहोत. जेव्हा तुम्ही आयपीएलमध्ये येता, तेव्हा आयपीएल सुरू होण्यापूर्वी एक आठवड्याचे शिबीर असते. मात्र, यांनी आमच्या अकादमीमध्ये हजारो चेंडूंचा सामना करत पाच आठवडे काम केले. आम्ही आनंदी आहोत की, आमच्या संघात त्या प्रकारचा फलंदाज आहे.”
आर अश्विनची खेळी
या सामन्यातील आर अश्विन याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने पंजाबविरुद्ध सलामीला फलंदाजी करताना 4 चेंडू खेळले. मात्र, त्याला यावेळी एकही धाव काढता आली नाही. तो शून्यावर तंबूत परतला. त्याला पंजाबच्या अर्शदीप सिंग याने चौथ्या षटकात दुसऱ्या चेंडूवर शिखर धवन याच्याकडून झेलबाद केले. (captain sanju samson revealed why rajasthan royals opened with ravichandran ashwin know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शानदार सुरुवात करणाऱ्या राजस्थानचा पंजाबविरुद्ध पराभव का झाला? संजू म्हणाला, ‘आमची लय…’
श्वास रोखून धरा! ‘हा’ घातक वेगवान गोलंदाज आरसीबीच्या ताफ्यात होणार सामील, हेड कोचनेच केलीय पुष्टी