आयपीएलचा ११ वा मोसम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आयपीएलच्या चर्चांना उधाण आले आहे. पण आता बीसीसीआयने आयपीएलच्या उदघाटन संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
७ एप्रिल पासून सुरु होणाऱ्या आयपीएल २०१८ च्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स व्यतिरिक्त सहा संघांच्या कर्णधारांना उपस्थित राहण्याची गरज नसल्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
त्यामुळे ६ एप्रिलला सर्व आयपीएल कर्णधार एक विशेष व्हिडीओ शूट करतील आणि मग आपापले संघ ज्या शहरात आहेत तिथे परततील.
मागील वर्षीपर्यंत आयपीएलचा उदघाटन सोहळा पहिल्या सामन्याच्या एक दिवस आधी व्हायचा. यावेळी सर्व कर्णधार स्पिरिट ऑफ क्रिकेटच्या प्रतिज्ञेवर स्वाक्षरी करायचे. पण प्रशासन समितीच्या निर्णयानुसार यावर्षी ७ एप्रिलाच मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात वानखेडेवर होणाऱ्या सामन्यापुर्वी आता हा उद्घाटन सोहळा होणार आहे.
तसेच ८ एप्रिलला दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असे दोन सामने होणार आहेत. त्यामुळे जर हे चारही संघांचे कर्णधार या उदघाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिले तर त्यांना हा सोहळा आटपून परत जाऊन लगेचच दुसऱ्या दिवशीच्या सामन्याची तयारी करावी लागेल. ज्यासाठी त्यांना खूप कमी वेळ मिळेल.
म्हणूनच आयपीएल कर्णधारांना उदघाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची गरज नसल्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.