आयपीएलच्या १५ सिझनला दणक्यात सुरुवात झाली आणि पहिल्याच आठवड्यात संघांनी नखे खायला लावण्यासारख्या सामन्यांची मेजवानी दिली. दुसऱ्याच सामन्यामध्ये आरसीबीने पंजाबला २०० धावा तडकवल्या अन् पंजाबने ते आव्हान आरामात गाठले. पंजाबच्या चेसचा नायक होता पहिला आयपीएल सामना खेळणारा वेस्ट इंडियन ओडेन स्मिथ. टीम संकटात सापडली असताना, ऑलराऊंडर स्मिथने धुवादार हीटिंग करत पंजाबला विजयीरेषेच्या पार नेले. त्याचबरोबर पुन्हा एकदा सिद्ध झाले की, आयपीएलमध्ये ’कॅरेबियन फ्लेवर’ बनता है.
आज आयपीएल जगातील सर्वात ग्रँड टी२० लीग बनलीये. जगभरातील सारे क्रिकेटर या लीगमध्ये खेळायला अक्षरशः तरसतात. ही इंडियन प्रिमियर लीग असली तरी, टॉपचे विदेशी खेळाडू लीगला चार चाँद लावतात. या विदेशी खेळाडूंमध्ये सर्वात जास्त मागणी कोणाला असते तर ती आहे वेस्ट इंडियन खेळाडूंना. आयपीएलचा पहिला सिझन असो नाहीतर हा पंधरावा सिझन हे कॅरेबियन खेळाडू नेहमीच आयपीएल गाजवत आलेत. या दीड दशकाचा टूर्नामेंटमध्ये वेस्ट इंडीज क्रिकेटच्या तीन पिढ्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे सामिल होतच आहेत.
आयपीएलचा पहिला सिझन खेळला गेला तेव्हा ख्रिस गेल आणि ड्वेन ब्रावो या दोनच कॅरेबियन खेळाडूंची चर्चा होती. ब्रावो मुंबई इंडियन्स, तर गेल केकेआरचा मेंबर झालेला. खऱ्या अर्थाने आयपीएलमध्ये कॅरेबियन फ्लेअर आणला तो कायरन पोलार्डने. २००९ ला भारतात जगातील टॉपच्या टी२० टीम्सची चॅम्पियन्स लीग खेळलेली. त्या चॅम्पियन्स लीगमध्ये विशीतील पोलार्ड त्रिनिदाद अँड टोबॅगो संघाकडून खेळायला आलेला. त्याने आपल्या तोडफोड बॅटिंगने लीग अशी काय गाजवली की, सर्व क्रिकेटजगताचे लक्ष त्याच्याकडे गेले. पोलार्ड २०१० आयपीएल लिलावात उतरला आणि साऱ्याच टीम त्याच्यामागे धावल्या. अखेर टायब्रेकरमध्ये चेन्नई आणि आरसीबीला मागे टाकत पोलार्ड मुंबईच्या पलटणमध्ये दाखल झाला. आपल्या पहिल्याच सीझनमध्ये मुंबईला फायनलपर्यंत घेऊन जाण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला. फायनलला याच पोलार्डने सीएसकेला शेवटपर्यंत घाम फोडलेला.
कॅरेबियन तडका खऱ्या अर्थाने बसायला सुरुवात झाली ती २०११ पासून आरसीबीचा डर्क नॅनेस दुखापत होऊन टूर्नामेंट बाहेर गेला आणि एन्ट्री झाली ती ख्रिस गेलची. टी२० क्रिकेट गाजवणाऱ्या गेलला त्यावर्षी कोणीही खरेदीदार लाभला नव्हता. नॅनेसचा रिप्लेसमेंट म्हणून आलेल्या गेलने आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये केकेआरविरूद्ध शतकी तडाखा देत ग्रँड कमबॅक केले. तो पूर्ण सीजन फक्त आणि फक्त गेलचा राहिला. एकही टीम त्याच्या तावडीतून सुटली नाही. तो आरसीबीला थेट फायनलमध्ये घेऊन गेला. पुढच्या वर्षी देखील गेलने तशीच दहशत माजवली.
गेल-पोलार्ड आयपीएलचे सुपरस्टार बनले असतानाच २०१२ ला आणखी एका कॅरेबियन प्लेअरची आयपीएलमध्ये एन्ट्री झाली. यावेळी त्याचे नाव होते सुनिल नारायण. मिस्ट्री स्पिनर हे बिरूद घेऊन तो आयपीएलमध्ये दाखल झाला. जी रेप्युटेशन घेऊन नारायण आयपीएलमध्ये दाखल झाला, ती रेप्युटेशन त्याने परफॉर्मन्समध्ये बदलली. केकेआरला पहिलीवहिली आयपीएल ट्रॉफी मिळवण्यात त्याने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. याच सीझनच्या शेवटी आणखी एक स्टार वेस्ट इंडीयन आयपीएलला मिळाला. तो म्हणजे ड्वेन स्मिथ. थोड्याफार प्रमाणात इंटरनॅशनल क्रिकेट खेळलेला ड्वेन स्मिथ त्यावेळी चर्चेत आला. ज्यावेळी लीग स्टेजच्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सला सीएसकेविरूद्ध लास्ट तीन बॉलवर १४ रन्सची आवश्यकता असताना स्मिथने सीझनची पहिली मॅच खेळताना हे टार्गेट पूर्ण करून दिले. हाच स्मिथ पुढे जाऊन चेन्नईचा दिग्गज ओपनर बनला.
खरंतर ख्रिस गेलच्या इंटरनॅशनल करियरला आयपीएलमुळे नवसंजीवनी मिळाली. जगाला युनिव्हर्स बॉस मिळाला. २०१२ पासून ड्वेन ब्रावोने आयपीएलमध्ये आपली छाप पाडायला सुरुवात केलेली, त्या कामगिरीला त्याने आणखीच चमक दिली ती २०१३ ला पर्पल कॅप जिंकून. तेव्हापासून भारतातच नव्हे तर जगात असा एकही क्रिकेटप्रेमी नसेल. जो या चॅम्पियनचा फॅन झाला नाही.
पोलार्ड, गेल, नारायण, ब्रावो ही नावे साऱ्यांची तोंडपाठ झाली असताना. सॅम्युएल बद्री, रवि रामपाल, केवॉन कूपर यांनीदेखील एखाद दोन सीझन गाजवत. आपली दखल घ्यायला भाग पाडले. त्याचवेळी आयपीएल २०१५ ला आगमन झाले आंद्रे रसेलचे. याआधी दिल्लीसाठी खेळताना त्याला संधी मिळाल्या नव्हत्याय २०१५ ला केकेआरमध्ये येताच जगाला वेगळा रसेल दिसला. गरज पडेल त्या नंबरवर बॅटिंगला येत बॉलर्सची कत्तल करायची एवढेच त्याला माहित. गेलसारखी बॅटिंग आणि ब्रावोसारखी बॉलिंग असं पॅकेज तो बनलेला. तेव्हापासून तो नारायणसोबत केकेआरचा महत्त्वाचा ‘नाईट रायडर्स’ बनला.
आयपीएल यशस्वी होण्यात या कॅरेबियन प्लेअर्सचा निश्चितच मोठा वाटा आहे. गेलने लीगची परिभाषा बदलून टाकली. ब्रावो केवळ आयपीएलचाच नाहीतर जगातील सर्वात यशस्वी टी२० गोलंदाज बनला. नारायण गोलंदाजी करता करता विस्फोटक ओपनर झाला. जगातील कोणतीही टी२० टीम पोलार्ड आणि रसेलशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आज हे सर्व खेळाडू खुल्या दिलाने मान्य करतात की, त्यांच्या यशात आयपीएलची मोठी भूमिका राहिलीय. आज वेस्ट इंडीज क्रिकेटची दुसरी पिढी निकोलस पूरन, शिमरन हेटमायर, ओडेन स्मिथ, रॉवमन पॉवेल यांच्या रूपाने आयपीएल गाजवतेय. या साऱ्यांनाच कोट्यावधींची बोली लागते. सर विवियन रिचर्ड्स, ब्रायन लारा हे कॅरेबियन दिग्गज कोच म्हणून याच लीगमध्ये मार्गदर्शन करताना दिसून येतात.
केवळ परफॉर्मन्सच नव्हेतर आपल्या लक्षवेधी सेलिब्रेशनने, कॅलिप्सोच्या तालावर, मस्तमौला अंदाजाने आणि भारताशी आपली विण आणखी घट्ट करत हे कॅरेबियन खेळाडू आपल्या आयपीएलला आणखी ‘ग्रँड’ बनवण्यात कायमच अग्रेसर राहिलेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
विराट आणि सचिन यांच्यातील नाते सांगणारे ४ भन्नाट किस्से